शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे नाराज होते का..? स्वतः फडणवीसांनी केला मोठा खुलासा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. मात्र तरीही थेट 12 दिवसांनी म्हणजेच गुरुवारी शपथविधी झाला. मोठा जनादेश मिळूनही, महायुतीने सरकार स्थापनेला विलंब का केला, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे खरच नाराज होते का, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला.

गुरुवारी झाला शपथविधी
काल 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. शपथविधीच्या दिवशी दुपारी दोन वाजल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, हे स्पष्ट झालं होतं. शिंदे खरंच नाराज होते का, याबाबतचा खुलासा शपथविधी सोहळ्यानंतर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शिंदे गटाची होती वेगळीच मागणी
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, "भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 137 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे पक्षाने ठरवलं होतं. पहिल्या बैठकीत स्वतः फडणवीसांनीही हे मान्य केलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दोन मतप्रवाह होते. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, असं अनेकांच मत होतं. पण काहींच असं सुद्धा मत होतं की, एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी कॉर्डिनेशन कमेटीच चेअरमन बनावं. या दोन मतप्रवाहामुळेच शपथविधीला उशीर झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
शिंदेंसाठी भाजपही होतं आग्रही
फडणवीस पुढे म्हणाले की, "आमच्या पहिल्या बैठकीतच ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार होते. पण पक्षातील काही नेते, कार्यकर्ते यांची त्यांच्या पक्षाचाच मुख्यमंत्री असावा, अशी इच्छा होती. आमच्या नेत्याचा मान असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असते. पण आमच्या मनात कुठलाही संशय नव्हता. माझे स्वत:चे एकनाथ शिंदेंसोबत चांगले व्यक्तीगत संबंध आहेत. त्यामुळे त्यावर ते अडून बसणार नाहीत, हे माहित होतं. मुख्यमंत्रीपद मी पद स्वीकारलं पाहिजे, असं मला माझ्या पक्षाने सांगितलं. मी ते ऐकलं. एक वास्तव हे सुद्धा आहे की, पक्षाचा मजबूत माणूस सरकारमध्ये नसेल, तर पक्ष चालत नाही. पण तरीही शिंदेंबाबत आम्ही सर्व आशावादी होतो," असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications