गोळ्या घालू, कार्यालय जाळू; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याला धमकी
मुंबई: ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे शरद कोळी प्रसिद्ध आहेत. याच शरद कोळी यांना आता जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी सोलापूर सदर बाजार पोलिसांत भादवी कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आल्याचे समजते.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शरद कोळी हे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आले. शरद कोळी यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.
विशेष म्हणजे शरद कोळी यांच्या भाषणामुळे त्यांना जळगाव जिल्ह्यात भाषणास बंदी घालण्यात आली होती. शरद कोळी यांनी सुरुवातीला शिंदे गटाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले होते.
नेमके काय आहे प्रकरण...?
चार दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदीपात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने त्यांना धमकी दिली होती. त्याचबरोबर सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याचीही धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोळी यांनी वाळू माफियाविरोधात मोर्चा उघडला आहे.
नेमकी काय दिली धमकी?
शरद कोळी हे 6 जुलैला आपला मित्र संतोष पाटील याच्यासोबत त्यांच्या शिवसेना कार्यालयात बसले होते. त्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील संबंधीत वाळू माफियाचा कोळी यांचा मित्र संतोष पाटील याच्या मोबाईलवर फोन आला. "मागील वेळी शरद कोळींच्या अंगावर लोकांना सोडून गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता.
त्यात सुदैवाने ते वाचले. मात्र यावेळी वाचणार नाही, जिथे दिसेल तिथे गोळ्या घालू. सोलापूर शहरातील त्यांचे कार्यालय जाळून टाकू", अशी धमकी वाळू माफियाने फोनवर दिली. यानंतर शरद कोळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.












Click it and Unblock the Notifications