Vasant Chavan : कोण होते नांदेडचे खासदार वसंत चव्हाण? राजकीय कारकीर्द अन् त्यांच्याविषयी घ्या जाणून
Nanded MP Vasant Chavan Political career and biography : काँग्रेस नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे नेते प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता.
वसंत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द तशी समिश्र राहीली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विजय आणि पराभवही पाहिले. ते एक मोठे राजकारणी आणि धुरंधर नेते म्हणून परिचित होते. नांदेड जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता होती, या नेत्याची राजकीय कारकीर्द आणि इतर गोष्टी जाणून घेऊया.

सरपंच ते खासदारकीचा प्रवास
वसंतराव चव्हाण यांचा जन्म 15 ऑगस्ट, 1954 रोजी झाला. ते नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. त्यांनी 2024 मधील 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता.
1978 साली नायगावचे सरपंच म्हणून वसंत चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्द सुरुवात झाली. त्यानंतर ते 1990 ते 2002 दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पदावर असताना लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.
नायगावचे पहिले आमदार
नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली. तेव्हा या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले.
अपक्ष म्हणून विधानसभेत
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
2024 लोकसभा निवडणुकीत विजयश्री
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची वाट मोकळी झाली. गत एप्रिल मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नांदेड लोकसभा निवडणूक सहज जिंकण्याचा मार्ग खुला झाला असेच सर्वांना वाटत होते. त्यात भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली.
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला, यामुळे अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये गेले तरीही नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसला अजूनही जनाधार असल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीतून बंडखोरी
वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदार संघातील प्रमुख नेते आहेत. ते व त्यांचे कुटुंब पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीने 2002 मध्ये त्यांना विधान परिषदेवरही पाठवले होते. पण 2009 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी केली. ते त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले. तेव्हापासून ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.












Click it and Unblock the Notifications