मंत्री जयकुमार गोरे प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी नाव घेतल्यावर सुप्रिया सुळे व रोहित पवारही स्पष्ट बोलले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एक मोठा गौप्यस्फोट केला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते अशी माहिती, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या नेत्यांची नावंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आ. रोहित पवार व खा. सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
मंत्री जयकुमार गोरे यांना न्यायालयाने क्लिनचिट दिलेले प्रकरण काही वर्षानंतर पुन्हा उकरून काढण्यात आले होते. या प्रकणावरुन चांगलेच राजकारण तापले होते. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सभागृहात धक्कादायक माहिती दिली. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं नाव घेत या नेत्यांसोबत आरोपी महिलेचे फोन कॉल्स झाले असल्याची माहिती सभागृहात दिली.
रोहित पवार काय म्हणाले?
आरोपींनी सुप्रिया सुळे व आ. रोहित पवारांना फोन केल्याची माहिती उघड केली. त्यांच्या या आरोपावर आ. रोहित पवारांनीही उत्तर दिले. जयकुमार गोरेंना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक आमची नावं घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपलं नाव घेतल्याचं आश्चर्य वाटल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं नाव घेतलंय. त्यामुळे सध्या चर्चेत असलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications