Shivaji Maharaj statue collapsed : मोठी बातमी... पुतळा कोसळण्याचं कारण सापडलं? CM शिंदे म्हणाले..
Shivaji Maharaj statue collapsed : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मालवण सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्याच्या तक्रारीवरुन मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

मुख्यंमत्र्यांनी केले कारण स्पष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या 35 फुटी पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची राळ उठवली आहे.
या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले होते की, विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केले होते. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे हे नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
स्ट्रक्चरल कन्सल्टंटने आरोप फेटाळले
याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मी संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन केले नव्हते. मी केवळ पुतळ्याच्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होतं. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असे चेतन पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ठाण्यातील संबंधित कंपनीवर पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे बघावे लागेल.












Click it and Unblock the Notifications