वडील जिवंत असताना वारसदार शोधायचा कशाला? फडणवीस असं नेमकं का म्हणाले? काय आहे वाद? वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपुरात संघाच्या कार्यालयात जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेना-यूबीटी नेते संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचा, दावा करत एकच खळबळ उडवून दिली. मोदींनी १० वर्षांनी नागपूरला जाऊन सरसंघचालकांना भेटणे, ही काही सामान्य गोष्ट नाही, असाही दावा राऊतांनी केला. राऊत यांच्या याच दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिलं.

संजय राऊतांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याबाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, राजकारणातून ७५ वर्षानंतर रिटायर्ड व्हावं, असं स्वतः मोदींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित सप्टेंबरमध्ये होणाऱ्या निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी मोदी हे आरएसएसच्या मुख्यालयात गेले असावेत. माझ्या माहितीनुसार, मोदीजी गेल्या १०-११ वर्षांत कधीही नागपूरला संघ कार्यालयात गेले नाहीत. यावेळी मोहन भागवतजींना टाटा-बाय-बाय, असे सांगायलाच ते मुख्यालयात गेले असावेत.
मोदींचा उत्तराधिकारी कोण?
राऊत पुढे म्हणाले, 'आता मला आरएसएसबद्दल दोन गोष्टी समजल्या आहेत. प्रथम, संघ परिवाराला देशाच्या नेतृत्वात बदल हवा आहे. दुसरे म्हणजे, आता मोदीजींचा काळ संपला आहे आणि त्यांना देशात बदल हवा आहे. पंतप्रधान मोदींचा पुढचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि संघ तो ठरवेल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णयही संघ घेईल. संघ ज्याला इच्छितो तोच भाजप अध्यक्ष होईल हे स्पष्टपणे दिसून येते, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
फडणवीसांचे जोरदार उत्तर
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात उत्तर दिले. ते म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन राज्याचा कारभार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले.












Click it and Unblock the Notifications