मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना अडवले, आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची मागणी, धाराशिवची घटना
Maratha reservation, CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्या जिल्ह्यातील आंदोलक आपल्या जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी करत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. अशीच घटना आज धाराशिव जिल्ह्यात घडली. मराठा आंदोलकांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच घोषणाबाजी करत हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात शिवसेना पक्ष मेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर घोषणाबाजी केली. त्यांचा ताफा रोखला. यावेळी शिंदे यांनी 5 मिनिटं वेळ देत त्यांचे निवेदन स्वीकारले.

विधानसभा निवडणुका अन् मराठा आरक्षण?
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुका तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न असा दुहेरी पट मोठा चर्चेचा विषय झाला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यापासून सुरु झालेला नेत्यांच्या अडवाअडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यातही आज पाहायला मिळाला आहे.
हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी
धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांचे निवेदन स्वीेकारले.
भुजबळांचा जरांगेंवर गंभीर आरोप
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली. त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले. एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला", असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.












Click it and Unblock the Notifications