महाराष्ट्र हादरला!एकीकडे वैष्णवांचा मेळा,दुसरीकडे महिला कीर्तनकाराची आश्रमात डोक्यात दगड घालून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गावागावातून लोक दिंडीद्वारे पंंढरपूराकडे निघालेले आहे. महाराष्ट्रातील रस्त्या रस्त्यावर सद्या वैष्णवांचा मेळावा भरलेला आपणास पाहायला मिळत आहे. एकीकडे आनंदाचे व प्रसन्नतेचे वातावरण वारकरी संप्रदायामध्ये आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वारकरी संप्रदायाशी संबंधित एक धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली. हभप संगीताताई अण्णासाहेब पवार (50, रा. चिंचडगाव-Female Kirtankar Sangeettai Annasaheb Pawar Murder) असे हत्या झालेल्या महिला कीर्तनकाराचे नाव आहे.

घटना कशी आली समोर?
या हत्येसंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हभप संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या. संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने वार केल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते. त्यांनी हभप संगीताताई पवार यांना आवाज दिला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये त्यांनी जाऊन पाहिले.
..तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या!
मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये गेले असता त्यांना हभप संगीताताई पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह त्यांचे पथक घटनास्थळी आले. श्वान पथक, व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
दोन महिन्यापासून राहत होत्या आश्रमात!
यासर्व घटनेनंतर महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांचे भाऊ कृष्णा पवार यांनी सांगितले की, संगीताताई या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली दोन वर्ष वृंदावनला राहिलेल्या आहेत. वृंदावनला राहून भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या येथे आल्या. त्यानंतर त्यांनी कीर्तनास सुरुवात केली.
सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, मी घरी येणार नाही. आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी जागा घेतलेली होती. त्या दोन महिन्यापासून येथे स्थायिक झाल्या होत्या. मी सकाळी शेतामध्ये असताना मला फोन आला की, इथे काहीतरी घडले आहे. इथे येऊन बघितले असता मला संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याचे समजले, याचा तपास होऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांनी काय वर्तविला हत्येबाबत अंदाज!
उपविभागीय पोलिस अधिकारी, भागवत फुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संगीताताई पवार या झोपलेल्या असताना कोणीतरी दगडाने त्यांच्या डोक्यात मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलेला आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. समोरच्या मंदिराचं कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले आहे. त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्या का? याबाबत तपास केला जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications