पुणे हादरले! आधी लॉजवर बर्थडे सेलिब्रेशन झाले, नंतर प्रियकराने केकच्या चाकूने चिरला प्रेयसीचा गळा
Pune wakad lodge murder : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून निर्माण झालेल्या संशयाने आणि संतापाने एका प्रियकराला क्रूर बनवले.
त्याने आपल्याच प्रेयसीचा निर्घृण खून केला आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत मेरी मल्लेश तेलगू (Meri Mallesh Telgu) या तरुणीचा खून झाला असून, तिच्या प्रियकर दिलावर सिंग (Dilawar Singh, वय २५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

लॉजवर बर्थडे सेलिब्रेशन, मग मोबाईल तपासणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलावर सिंग आणि मृत मेरी मल्लेश तेलगू हे दोघे २०१९ पासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेरीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला होता. या संशयावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. मेरीने आपल्या दुसऱ्या प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच दिलावरचा राग अनावर झाला आणि त्याने खुनाचा कट रचला.
शनिवारी दिलावरने मेरीला पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरातील एका लॉजवर बोलावले. तिथे दोघांनी एकत्र केक कापून मेरीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपताच दिलावरने मेरीचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये मेरी आणि तिच्या दुसऱ्या प्रियकराचे काही आक्षेपार्ह फोटो त्याला दिसले.
केक कापलेल्या चाकूनेच केला वार
मोबाईलमधील फोटो पाहताच दिलावरचा संताप शिगेला पोहोचला. त्याने क्षणाचाही विलंब न करता केक कापण्यासाठी वापरलेला चाकू उचलला आणि मेरीवर सपासप वार केले. हे वार इतके गंभीर होते की, यात मेरीचा जागीच मृत्यू झाला. ज्या हातात केक कापला, त्याच हाताने आणि त्याच चाकूने प्रियकराने आपल्या प्रेयसीचा जीव घेतल्याची ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
हत्येनंतर प्रियकराने स्वतःच दिली कबुली
आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर सिंग हा स्वतःहून कोंढवा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना 'मी माझ्या प्रेयसीची हत्या केली आहे,' असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. कोंढवा पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती वाकड पोलिसांना दिली.
वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, मेरी मल्लेश तेलगूचा मृतदेह लॉजच्या खोलीत आढळून आला. वाकड पोलिसांनी आरोपी दिलावर सिंगला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला आहे. प्रियकराच्या संशयाने आणि संतापाने एका तरुणीचा जीव घेतला असून, वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications