मोठी बातमी: संजय राऊतांच्या निवासस्थानी बॉम्बची धमकी! शोध पथक-पोलिसांचा गराडा; परिसरात खळबळ
Bomb squad at Sanjay Raut house : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.
या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने राऊतांच्या घरी दाखल झाले असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एका कारवर ही धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही धमकी कोणत्याही पत्राद्वारे किंवा फोनवरून नसून, कारच्या काचेवर साचलेल्या धुळीवर हाताने लिहिलेली आहे.
काय लिहिले आहे धमकीत?
"आज हंगामा होगा. आज रात बारा बजे बॉम्ब ब्लास्ट होगा." आज ३१ डिसेंबर म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि मध्यरात्री १२ वाजता सर्वत्र उत्सवाचे वातावरण असतानाच ही वेळ साधून देण्यात आलेल्या धमकीमुळे यंत्रणांची झोप उडाली आहे.
यंत्रणा सतर्क: तातडीने शोधमोहीम सुरू
संजय राऊत यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना याची कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तातडीने राऊतांच्या घराकडे धाव घेतली.
तपासणी: बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून संजय राऊत यांचे घर, गार्डन आणि आसपासच्या परिसराची मेटल डिटेक्टर व श्वान पथकाच्या साहाय्याने तपासणी केली जात आहे.
संशयास्पद वस्तू: आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, मात्र पोलीस कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशा संवेदनशील काळात शिवसेनेच्या बड्या नेत्याला अशा प्रकारे धमकी मिळणे, याकडे पोलीस गांभीर्याने पाहत आहेत. हा कुणाचा खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठे कारस्थान आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
आज ३१ डिसेंबर असल्याने मुंबईत सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यातच राऊतांच्या घराबाहेर अशा प्रकारची धमकी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संजय राऊत यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications