भाजपचं ठरलं! सर्व्हे झाला, आता 'एवढ्या' जागा लढणार, एकनाथ शिंदे अजित पवारांच्या वाट्याला काय?
लोकसभेतील अपेक्षाभंगानंतर महायुती आता ताकही फुंकून पिणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विश्वासू भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील जय-पराजयाचा सर्वे झाला असून, भाजपने किमान १५० जागांवर दावा ठोकण्याची शक्यता वाढली आहे.
भाजपला हव्यात किमान 150 जागा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार राज्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच मागणीवर स्थानिक नेते कायम असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेला पक्षाने 150 जागा लढवणे कशाप्रकारे आवश्यक आहे, हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.

अमित शाहा तीन दिवस महाराष्ट्रात
भूपेंद्र यादव यांच्याकडून आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आज सकाळी 10 वाजता एक बैठक घेतली जाणार आहेत. या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे अमित शहा 16,17,18 तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहावे लागेल.
लोकसभेला मिळालेल्या मतांची गोळाबेरीज
महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत.
गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल व सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाईल.
आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते.
अजित पवार, शिंदेंना किती जागा?
या सर्व पार्श्वभुमीवर महायुतीतील घटक पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला 80-80 जागा मिळणार आहेत हे जरी खरं असलं तरी महायुतीत जागा वाटपात शिंदेंना 90 पेक्षा अधिक तर अजित पवारांनाही 85 च्या आसपास जागा हव्या आहेत.












Click it and Unblock the Notifications