तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची यावेळी वाट बिकट राहणार का? भाजपला विजयाची आशा!
Tivasa Assembly Constituency Amravati News :महाराष्ट्रात या महिन्याच्या शेवटी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. कॉंग्रेसच्या फायर ब्रॅण्ड नेत्या असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघाकडे महायुतीत अर्थात भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या मजबूत पकडीत राहिला असून, खासदार यशोमती ठाकूर यांनी तिवसाच्या राजकीय वाटचालीत आपला ठसा उमटवला आहे. दुसरीकडे, भाजपला 2004 पासून येथे विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तडा देण्यासाठी भाजप आणि महायुतीची ताकद पणाला लागणार आहे.

तिवसा मतदारसंघाचा राजकीय इतिहास
सन 1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या नऊ निवडणुकांत काँग्रेसने पाच वेळा विजय मिळवला आहे. भैय्यासाहेब ठाकूर, शरद तसरे यांच्यासह भाकपचे कॉम्रेड मंगळे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपकडून साहेबराव तट्टे यांनी 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकांत विजय मिळवला. पण, त्यानंतर या मतदारसंघात भाजपची स्थिती ढासळली. 2009 पासून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी हा गड अभेद्य राखला आहे.
यशोमती ठाकूर यांची संघटनात्मक यशस्वी वाटचाल
सन 2004 च्या पराभवाने खचून न जाता यशोमती ठाकूर यांनी सतत मतदारांशी संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्यांच्या कामाचा परिणाम तीन निवडणुकांमध्ये दिसला. विशेषतः 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधातच त्यांच्या सख्ख्या बहिणीने बंड पुकारले होते, तरीदेखील मतदारांनी यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवला. विदर्भातील एकमेव काँग्रेस उमेदवार म्हणून त्या विजयी ठरल्या.
महायुतीकडून कोण इच्छुक
सन 2019 मध्ये भाजपने मोठी रणनीती आखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 'महाजनादेश यात्रा' तिवसा मतदारसंघातील गुरुकुंज मोझरी येथून सुरू केली होती. परंतु, तेव्हा ही जागा भाजपऐवजी शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेचे राजेश वानखडे यांना 10 हजार 361 मतांनी पराभव पत्करावा लागला. आता वानखडे भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपकडून त्यांच्यासह निवेदिता चौधरी आणि रविराज देशमुख हे देखील उमेदवारीसाठी दावेदार आहेत. शिवसेना शिंदे गटाने देखील या मतदारसंघावर आपली नजर ठेवली आहे.
मिश्र वस्तीचा मतदारसंघ
मतांचे गणित तिवसा हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक आहे. येथे मराठा-कुणबी, माळी आणि मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून, धनगर व तेली समाजाचीही मोठी उपस्थिती आहे. या मतदारसंघात कोणत्याही एका जातीय घटकाचे वर्चस्व नाही. 20.88 % अनुसूचित जातीचे मतदार आणि 5.17 % अनुसूचित जमातीचे मतदार इथे आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी सर्वसमावेशक धोरण आखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
विकासाच्या प्रश्नांवर लक्ष
तिवसा मतदारसंघातील प्रमुख समस्या म्हणजे शेतातील पांदन रस्त्यांचा अभाव, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि औद्योगिक विकासाचा अभाव. एमआयडीसीच्या सुविधांचा अभाव या भागाच्या विकासात अडथळा ठरत आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी जरी संघटनात्मक बांधणी केली असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर भाजप व महायुती त्यांना लक्ष्य करणार आहेत.
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला
अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना तिवसा मतदारसंघातून 10 हजार 576 मताधिक्य मिळाले होते. या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे काँग्रेसने यंदाही आपली पकड कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे.
महायुतीसमोरील आव्हान
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला काँग्रेसच्या भक्कम संघटनात्मक बांधणीला छेद देण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तिवसा मतदारसंघातील निवडणूक संघर्ष एकास एक लढतीचे रूप घेणार असून, कोणतेही चुकीचे पाऊल दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते.
तिवसा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप-शिवसेना महायुती यांच्यात काट्याची टक्कर अपेक्षित आहे. एका बाजूला यशोमती ठाकूर यांचे संघटनात्मक वर्चस्व आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपची नव्या उमेदवारांसह लढण्याची तयारी आहे.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न!










Click it and Unblock the Notifications