'सुसंस्कृतपणाचा मुखवटा उतरला!' अमोल बालवडकरांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; चंद्रकांतदादांचा प्रहार
Amol Balwadkar Nilesh Ghaiwal Video | पुण्यात सध्या राजकीय धुरळा उडाला आहे, पण हा धुरळा प्रचाराचा नसून एका खळबळजनक व्हिडिओचा आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांनी आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओने पुण्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. या व्हिडिओमध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) हे चक्क पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबत बसून मद्यप्राशन करताना दिसत आहेत.

ज्या निलेश घायवळवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ज्याच्या नावाचा शहरात दरारा आहे, अशा गुंडासोबत बालवडकर पार्टी करत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
तिकीट का कापलं, आता समजलं असेल!
अमोल बालवडकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता समोर आलेल्या पुराव्यांवरून चंद्रकांत पाटील यांनी थेट निशाणा साधला. पाटील म्हणाले, "स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या अमोल बालवडकरांना आता समजलं असेल की त्यांचं तिकीट का कापलं गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याकडे प्रत्येकाची खडानखडा माहिती असते. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही, हेच यावरून स्पष्ट होतं" असंही ते म्हणाले.
चंद्रकांतदादांचा बोचरा टोला: 'निलेश घायवळचा पत्ता बालवडकरांना विचारा'
गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस ज्या निलेश घायवळचा शोध घेत आहेत, तो घायवळ परदेशात पसार असल्याचे बोलले जाते. याच मुद्द्यावरून चंद्रकांतदादांनी अमोल बालवडकरांना टोला लगावला. "निलेश घायवळ सध्या कुठे आहे, हे शोधण्यासाठी पोलिसांनी आता अमोल बालवडकरांचीच मदत घ्यावी. त्यांचे घायवळसोबतचे फोटो आणि व्हिडिओ आहेत, म्हणजे त्यांचे संबंध किती घट्ट आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही," असे उपरोधिक विधान त्यांनी केले.
या व्हिडिओमुळे भाजपला आयतं कोलीत मिळालं आहे. "जर अमोल बालवडकर भाजपचे उमेदवार असते, तर पक्षाची किती नाचक्की झाली असती याची कल्पनाच केलेली बरी," अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. एकीकडे पुणेकर गुन्हेगारीमुक्त शहराची अपेक्षा करत असताना, दुसरीकडे जबाबदार लोकप्रतिनिधी अशा गुंडांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर ते शहराच्या सुरक्षेसाठी घातक असल्याचे चित्र या व्हिडिओमुळे निर्माण झाले आहे.
नेमकी चर्चा काय?
- पार्टीचा व्हिडिओ: अमोल बालवडकर आणि निलेश घायवळ एकाच टेबलावर बसून मद्यप्राशन करत असल्याचे दृश्य.
- नैतिकतेचा प्रश्न: सुसंस्कृत राजकारणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराचे गुन्हेगारी जगताशी लागेबांधे चव्हाट्यावर.
- राजकीय भविष्य: या व्हिडिओमुळे अमोल बालवडकरांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, विरोधकांनी याला 'पुण्याच्या गुन्हेगारीकरणाचा' पुरावा मानले आहे. दुसरीकडे अमोल बालवडकर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे.
आता या व्हिडिओवर आणि चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर अमोल बालवडकर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications