बीड हादरले; एकाच बॉयफ्रेंडसाठी मैत्रिणीनेच मैत्रिणीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट, Video!
Beed crime Woman kills friend love triangle : बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेमकथेच्या गुंतागुंतीतून दोन मैत्रिणींच्या नात्याचा करुण अंत झाला.
एका पुरुषाच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून एका मैत्रिणीनेच दुसऱ्या मैत्रिणीचा खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची निर्दयीपणे विल्हेवाट लावली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आरोपीचा पर्दाफाश झाला आहे.

नेमकं काय घडलं?
या प्रकरणात मृत तरुणीचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असून, ती गेवराई येथील लुखामसला येथे राहत होती. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे अपघाती निधन झाले होते आणि ती तिच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. अयोध्या नुकतीच होमगार्डमध्ये भरती झाली होती.
अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे एका राठोड आडनावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापासून राठोड आणि अयोध्या यांच्यात जवळीक वाढली. यामुळे फडताडेला अयोध्या आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे वाटले आणि याच संशयातून तिने अयोध्याला संपवण्याचा कट रचला.
Beed Crime : होमगार्ड तरुणीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, मैत्रिणीनेच केला घात...! #Beednews #BeedCrime pic.twitter.com/4eKeEGxRe6
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) August 23, 2025
खून आणि मृतदेहाची विल्हेवाट!
फडताडेने अयोध्याला आपल्या घरी बोलावले आणि तिथे तिचा गळा दाबून खून केला. यानंतर तिने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका खोक्यात भरला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तिने आपल्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तो खोका दुचाकीवरून शहराबाहेरील एका नाल्यात फेकून दिला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा
पोलिसांना तपास करताना सुरुवातीला आरोपी महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी तिच्या शेजारच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये, आरोपी महिला तिच्या मुलासोबत खोका घेऊन दुचाकीवरून जाताना स्पष्टपणे दिसत होती.
हे फुटेज पाहिल्यावर आरोपी महिलेने आपली बोबडी वळाली आणि तिने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. मित्राच्या प्रेमासाठी एका मैत्रिणीने आपल्याच मैत्रिणीचा जीव घेतला आणि स्वतःच्या मुलाला या गुन्ह्यात सहभागी करून घेतले, ही बाब संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी हादरवून टाकणारी आहे.












Click it and Unblock the Notifications