गुंडगिरी अन् बलात्काराच्या घटनांमुळे जनतेचा आक्रोश; सोमवारी महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा राहणार बंद!
Beed News : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या घटनांत प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात बीड जिल्हा हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्हा जास्त चर्चेत आलेला आहे. वाल्मीक कराड गॅंगला अटक झाली, तरी देखील या जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होत नाही.
बीडमध्ये कधी मारहाण, कधी दहशत पसरवण्याचा प्रकार, कधी रिल्स, तर कधी बँकेच्या फसवणुकीमुळे कर्जबाजारीमुळे आत्महत्यासारख्या धक्कादायक घटना सातत्याने सामोऱ्या येत आहेत. त्यातच, आता बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोमवारी बीड बंदची हाक!
बीड शहरामघ्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर आता लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
याबाब पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे. संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन शिक्षक फरार!
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला.
क्लास चालकांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप!
दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
क्लासची इमारत सील
बीड जिल्ह्यात खासगी क्लासमधील अल्पवयीन मुलीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने पोलिसांना सदर क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, या क्लासमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन अजून अशा तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा असे निर्देश दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications