कुख्यात गुंड खोक्या उर्फ सतीश भोसलेला कशी झाली अटक; BJP आमदार सुरेश धस काय म्हणाले?
सतीश भोसले उर्फ 'खोक्या' याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
सतीश भोसले हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. त्याच्यावर गेल्या आठवडाभरात तीन गुन्हे दाखल झाले. पोलिसांना न सापडणारा हा खोक्या मात्र, काल एका मराठी वृत्तवाहिणीला मुलाखत देताना दिसला. त्यानंतर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अखेर आज पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
बीडमध्ये आणण्यापूर्वीच तडीपारीची कारवाई!
खोक्याला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे, आता खोक्या उर्फ सतीश भोसलेची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले.

पोलिसांनी कशा आवळल्या मुसक्या?
प्रयागराजमधील स्थान मिळाल्यानंतर, महाराष्ट्र पोलिसांनी येथील पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक केली. महाराष्ट्र पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी प्रयागराजला पोहोचतील. आरोपी सतीश खोक्याचे प्रकरण सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
एकास बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप
प्रयागराजमध्ये लपून बसलेला असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण प्रकरणाचा त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता यानंतर तो फरार झाला होता. तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फिरल्यानंतर तो प्रयागराजला गेल्याचे पोलिसांना समजले आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा : बीडमध्ये चाललंय काय! देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश धसांच्या माणसाने एकाला बॅटीने केली मारहाण, VIDEO
खोक्या मागचा बोक्या शोधा- वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, खोक्या भेटला हे चांगलेच झाले. पण त्यांच्या मागचे बोके कोण हे शोधले पाहिजे. इकडे बाकाचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधा. त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून आले. सोन्याचा खजाना कुठून येतो, हे शोधले पाहिजे.
खोक्याला अटक ही चांगली बाब- सुरेश धस
सतीश भोसले यांने जी चूक केली आहे त्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. मी कधीच कोणत्याच पोलिसांना फोन करत नाही. खोक्या भोसलेवर कारवाई करा असे मी म्हटलो आहे. त्याच्यावर जी कलमं आहे, त्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल.
हे ही वाचा : बीड पुन्हा पेटले; सतीश भोसले व सुरेश धसांविरोधात उद्या शिरुरमध्ये मोर्चा, ओबीसी नेत्याचा मोठा आरोप
कारला नंबरप्लेट नसल्यामुळे वाढला गुंता
सतीश भोसले उर्फ खोक्या याची चार चाकी कार शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील रायमोहा शिवारात सोमवारी रात्री साडेदहा वाजता जप्त केली आहे. परंतू कारवर पुढच्या बाजुने नंबर दिसून येत नाही. चालकाने नंबरप्लेट काढून सदरील कार शिवारात लावली असावी असा संशय पोलिसांना आहे.
200 हरणांची शिकारीचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्च 2025 रोजी बीडमधील शिरूर शहराजवळील झापेवाडी शिवारातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. सतीश भोसले यांच्या घरातून वन्य प्राण्यांचे मांस आणि शिकारीची उपकरणे सापडली. खोक्यावर जवळपास 200 हरणांची शिकार केल्याचाही आरोप आहे. जिल्हा वन अधिकाऱ्यांसह 40 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गांजासारख्या पदार्थाचे दोन पॅकेट देखील सापडले. सतीश भोसले उर्फ खोक्या गाडीच्या बोनेटवर उभे राहून हवेत नोटा उडवत असल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
खोक्या उर्फ सतीश भोसले नेमका कोण आहे?
- खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
- गोल्डमॅन म्हणूनही सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे.
- शिरुर कासार परिसात खोक्याची दहशत आहे. तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जातं.
- व्हिआयपी कल्चर, व्हिआयपी कार, हातात सोन्याचे ब्रेस आणि कडे, तसंच गळ्यात सोन्याची माळ त्यामुळे गोल्डमॅन म्हटलं जातं.
- सतीश भोसले हा उंची आणि लॅव्हिश आयुष्य जगतो. त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
- दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उधळताना दिसतो आहे. सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असंही दिसतं आहे.
- मागच्या सहा ते सात वर्षांपासून खोक्या भोसले राजकारणात सक्रीय आहे. सतीश भोसले हा बीडच्या शिरुर शहराजवळ पारधी वस्तीत राहतो.












Click it and Unblock the Notifications