बीड पुन्हा पेटले; सतीश भोसले व सुरेश धसांविरोधात उद्या शिरुरमध्ये मोर्चा, ओबीसी नेत्याचा मोठा आरोप
शिरुर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या हा त्याच्या दहशतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वन्यप्राण्यांची तस्करी करुन तो गब्बर झाला असल्याचे सांगितले जाते. तो आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही केला जातो. याच प्रकरणात आता बीड जिल्ह्यातील ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी एक मोठा आरोप केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्या हाच सुरेश धस यांना हरणाचे मटन पुरवत असल्याने त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होत नाही, असं टी. पी. मुंडे यांचे म्हणणे आहे. सुरेश धस व सतीश भोसले या दोघांवरही याप्रकरणात गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी शिरुरमध्ये उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही टी. पी. मुंडे यांनी दिली.

नेमका काय आहे आरोप?
सतीश भोसले उर्फ खोक्यावर दहशत केल्याचा आरोप आहे. रोज त्याच्या दहशतीचा नवा व्हिडीओ समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यापेक्षा जास्त गुन्हे सतीश भोसले याच्यावर दाखल आहेत. हरिण, रानडुक्कर यांच्या तस्करीला बंदी असताना सतीश भोसले सर्रास या प्राणांची कत्तल करतोय. मात्र त्याच्यावर सुरेश धस यांच्यामुळे गुन्हे दाखल होत नाहीत, असा आरोप ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी केला. सुरेश भोसले हा हरणाचे मटन सुरेश धस यांना पोहोच करतो, असंही मुंडे यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
सतीश भोसले यांच्या कुकर्माबाबत व त्याचा आका म्हणजेच सुरेश धस यांच्या तक्रारीबाबत आपण लवकरच वनमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे टी. पी. मुंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, सुरेश भोसले उर्फ खोक्या व त्याचे साथीदार सुरेश धस यांना तीन-चार किलो हरणाचे मटन घेऊन जातात, त्यामुळेच सुरेश धस त्याच्यावर गुन्हे दाखल होऊ देत नाही.
उद्या शिरूरमध्ये मोठा मोर्चा
हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. ते पण आकांचे आका आहेत. हरीण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते? असा सवाल करत मुंडे यांनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी धस आणि खोक्या यांच्याविरोधात उद्या (रविवारी) शिरूर येथे मोठा मोर्चा काढणार असल्याचे टीपी मुंडे म्हणाले. दरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
वनविभाग ॲक्शन मोडवर
शिरूर कासारचा भाजप पदाधिकारी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या गुन्हे करून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खोक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. शिरूर कासार पोलीस स्टेशन आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईतून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. त्याच्या घरातून पथकाने मेलेल्या प्राण्याचे वाळलेले मास जप्त केले आहे. साधारणपणे हे मास एका महिन्यापूर्वी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हे मास कोणत्या प्राण्याचे आहे हे फॉरेन्सिक लॅब मध्ये तपसानंतर स्पष्ट होणार आहेत. तसेच पोलिसांनी खोक्याच्या वस्तीवर आणि इतर घराची झाडाझडती घेऊन वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्या जप्त केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications