बाब्बोव..! 11 गावांत 1०० रुग्ण; टक्कल पडण्याचा संसर्गाने बुलढाणा हैराण, आरोग्य विभाग म्हणतो...
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केस गळतीच्या व टक्कल पडण्याच्या संसर्गाने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाला प्रयत्न करुनही या आजाराचे कारण अद्याप सापडलेले नाही. आज पुन्हा आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल झाली. एकाच कुटुंबात थेट तीन-चार रुग्णाला टक्कल पडण्याच्या आजाराने ग्रासल्याने चिंता वाढली आहे. यात लहान मुलांचे प्रमाणही आहे.

11 गावांत संसर्ग
शेगाव तालुक्यातील तब्बल 11 गावातील लोकांना या केस गळतीच्या संसर्गाने ग्रासले आहे. आत्तापर्यंत सुमारे १०० रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केस गळतीच्या रुग्णात देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बोंडगाव येथील भिकाजी मोरखडे यांच्या कुटुंबातील 3 जणांचे टक्कल पडले आहे. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सुरुवातीला त्यांना गोळ्या दिल्या होत्या, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज पुन्हा त्यांची तपासणी केली असून नमुने घेतले आहेत. एकाच कुटुंबातील तीन-चार जणांना या आजाराने ग्रासले असल्याने चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाच्या सूचना
आरोग्य विभागातर्फे गावात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जोपर्यंत केस गळतीचे नेमके कारण सापडत नाही, तोपर्यंत गावकऱ्यांनी गावातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वापरू नये, अशी सूचना आरोग्य विभागाने गावकऱ्यांना दिल्या आहेत. डॉक्टरांनादेखील केसगळतीचं कारण समजत नसल्याने अनेक जण चिंतेत आहेत. आता या प्रकरणात आरोग्य विभागाकडून कशाप्रकारे परिस्थिती हाताळली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
आरोग्य विभाग दाखल
अकोला मेडिकल कॉलेज आणि बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य विभागाची एक मोठी टीम आज बोंडगावमध्ये दाखल झाली. गावकऱ्यांच्या केस, रक्त, तसेच त्वचेचे नमुने पुन्हा एकदा या टीमने गोळा केली आहेत. त्यामुळे पुढचे आठ दिवस तरी या नमुन्यांचे परीक्षण अहवाल प्राप्त होण्यास लागतील. त्यामुळे तोपर्यंत गावकऱ्यांनी गावातील दूषित पाणी वापरू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications