निकालाआधीच बच्चू कडू यांचे मोठे विधान, म्हणाले, तिसऱ्या आघाडीचंच सरकार येईल...
Third Alliance in Maharashtra- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेज 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्यादृष्टीने महायुती व महाविकास आघाडी या दोघांनीही आपलेच सरकार येईल, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. आता महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीनेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनीही मोठा खुलासा करुन खळबळ उडवून दिली आहे.

काय आहे बच्चू कडूंच्या मनात?
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्हींकडून आम्हाला संपर्क करणं सुरु आहे. पण अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. आम्ही वेगळ्या सरकारचं स्वप्न पाहत आहोत. आमचे चार ते पाच आमदार निवडून येतील. उद्या निकालानंतर एकदा कल हातात आला की, आम्हीही जुळवाजुळव करु. आम्ही तिसरी आघाडी केली आहे आणि तिच सत्तेवर येईल, असा निर्णय घेतला जाणार आहे. कुणाला पाठींबा देण्याऐवजी आम्ही आमचे सरकार बनविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत.
एक्झिट पोलवर विश्वास नाही- कडू
एक्झिट पोलबाबत बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी त्यावर विश्वास नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, एक्झिट पोल हे बोगस असतात. उद्याची वाट बघा. कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांना धरून झालेली नाही. आम्ही काही मूलभूत मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तसं झाल नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवरचे उमेदवार, जात- धर्म अशा मुद्द्यांना धरून झालेली आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
तिन्ही आघाड्यांकडून जुळवाजुळव
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे सरकार कुणाचं स्थापन होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेक संस्थानी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी असं कुणालाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसल्याने उत्सुकता ताणली आहे. त्यातच आता बच्चू कडू यांनीही तिसऱ्या आघाडीचं सरकार येईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्याच नजरा उद्याच्या निकालाकडे लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications