एनसीपी नेते Baba Siddique हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, कशी झाली अटक?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तर बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल यास कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. तर त्याला मुंबईत आणण्यासाठी आता मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
बनावट पासपोर्टद्वारे कॅनडात पोहोचला झिशान
बाबा सिद्दिकी हत्येमागील मास्टरमाईंड तथा मुख्य फरार असलेला आरोपी झिशान अख्तर कॅनडात सापडल्याची माहिती. सूत्रांच्या हवाल्याकडून सांगण्यात आली. झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान कॅनडात पोहोचला होता, अशी माहिती समोर आली. मुंबई पोलीस झिशान अख्तरला ताब्यात घेण्याची माहिती वरिष्ठ पातळीवर घेत आहेत.

कधी झाली होती बाबा सिद्दीकी यांची हत्या?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या 12 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आली होती. झिशान सिद्दिकी याच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीकडून करण्यात आला होता.
झिशान मुळ जालंधरचा, हत्येच्या वेळी होता घटनास्थळी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार असलेला झिशान अख्तर हा जालंधरचा रहिवासी आहे. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा तो घटनास्थळी होता. त्यानंतर तो भारत सोडून पळून गेल्याचं समोर आलं आहे. यासाठी झिशान अख्तरनं पाकिस्तानातील अंडरवल्डमधील शहझाद भट्टीची मदत घेतल्याची माहिती आहे. शहझाद भट्टी हा फारुक खोखर गँगचा सदस्य आहे.
झिशान अख्तरनं 2025 च्या सुरुवातीला एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणि भारतातील इतर गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचं म्हटलं होतं.
कोण आहे झिशान अख्तर?, 9 गुन्ह्यांचा समावेश
झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा 9 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. 7 जून 2024 रोजी जीशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटकेत गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप यांना अटक केली होती. तर त्यावेळी आरोपी शिवकुमार गौतम फरार झाला होता. आता झीशान सिद्दिकी मुंबई पोलिसांच्या ताब्यात कधी मिळतो याकडे लक्ष लागलंय.












Click it and Unblock the Notifications