बाबा सिद्धीकीची हत्या करणाऱ्या आरोपीची झाली 'ऑसिफिकेशन टेस्ट'; पण ही चाचणी आहे तरी काय? वाचा
Baba Siddique murder : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. करनैल सिंह (रा. हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे होती. मात्र त्यापैकी धर्मराज हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकीलांनी कोर्टात केला होता.
त्यानंतर कोर्टाने करनैल सिंहला 21 ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली व अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या धर्मराजची 'ऑसिफिकेशन टेस्ट' करण्याचा दावा केला होता. आरोपीच्या वडिलांनीही मुलगा 17 वर्षांचा असून ही टेस्ट करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर डाँक्टरांनी ही टेस्ट केली.

आत्तापर्यंत सहा आरोपी झाले निष्पन्न
माजीमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. या प्रकरणाशी निगडित सहा आरोपींची नावे पोलिसांनी उघड केली. यापैकी दोघांना ताब्यात घेतले. सलमान खानला मदत करणाऱ्या प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल, अशा आशयाची पोस्ट या टोळीशी संबंधित एका आरोपीच्या केली होती. ताब्यात घेतलेल्या एका आरोपीच्या वकीलांनी तो अल्पवयीन असल्याचा दावा कोर्टात केला. त्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचा आदेश दिला.
आरोपीने नेमका दावा काय?
बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला होता. हे सर्व आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तत्काळ दोघांना बेड्या ठोकल्या. तिसरा आरोपी फरार झाला. न्यायालयाने गुरनैल सिंह या 23 वर्षीय आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. तर अटक केलेला दुसरा आरोपी धर्मराज कश्यपने मी अल्पवयीन असल्याचा दावा कोर्टात केला. त्याच्या वकीलांनी तो फक्त 17 वर्षांचा आहे, असे कोर्टाला सांगितले. त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, असा दावाही केला. या दाव्यानंतर न्यायालयाने त्याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश दिले.
टेस्टमधून नेमकं काय समोर आलं?
त्यानंतर आरोपी धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करण्यात आली. वडीलांनीही या टेस्टची परवानगी दिली. या टेस्टनुसार आरोपी अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर न्यायालयाने त्याला सज्ञान ग्राह्य धरुन 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वाढली आहे.
काय असते ऑसिफिकेशन टेस्ट?
मानवी शरीराचा विकास होणे, हाडे तयार होणे या प्रक्रियेला ऑसिफिकेशन म्हणतात. लहानपणापासून ते किशोरावस्थेपर्यंत माणसाच्या शरारात हाडांचा विकास होतो. एका विशिष्ट वयात हाडांचा विकास होण्याची प्रक्रिया थांबते. त्यानंतर शरीरातील हाडे टणक व्हायला सुरुवात होते. म्हणजेच हाडात कॅल्शियम, फॉस्फरस हे घटक जमा व्हायला सुरुवात होते. हाडांचा विकास वयाच्या विशिष्ट टप्प्यात मंदावतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. सगळ्यांची शरीररचना सारखी नसली तरी, हाडांची ही प्रक्रिया एका विशिष्ट टप्प्यापर्यंत होते. ह लक्षात घेऊन, काही प्रकरणात न्यायालय अल्पवयीन आरोपीची अशी टेस्ट करण्याची परवानगी देते.
ही टेस्ट नेमकी कशी केली जाते?
ऑसिफिकेशन टेस्ट किंवा इपिफायजल टेस्ट ही शरीरातील एका हाडाची केली जाते. शरीरातील विशिष्ट हाडांचा एक्स-रे काढला जातो. या हाडांचे ऑसिफिकेशन म्हणजेच वय किती झाले आहे, याचा अभ्यास केला जातो. वयानुसार माणसाच्या हाडांत बदल होत असतात. हे बदल सुरु आहेत की थांबलेत, हे या टेस्टमधून समजते. म्हणूनच ऑसिफिकेशन टेस्टसाठी हाडांचा एक्स-रे काढला जातो. ही टेस्ट यक्तीचे वय ठरवण्यासाठीची निर्दोष समजली जात नाही. कारण आजार, दुखापत, कुपोषण आदी गोष्टींमुळे हाडांच्या ऑसिफिकेशनवर परिणाम होऊ शकतो, असं डाँक्टरांचं मत आहे.












Click it and Unblock the Notifications