“एक वारकरी एक झाड” उपक्रम राबवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा आणि संकल्प केले आहेत. 'एक वारकरी एक झाड' हा अभिनव उपक्रम राज्य सरकारकडून राबविण्यात येणार असून वारीतील पालखी मार्गावर अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या "पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी" या उपक्रमाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे यशस्वी सांगता झाली.
गेल्या काही वर्षात पर्यावरणात झालेल्या बदलांचा फटका आपल्याला बसतो आहे. पाऊस कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रत्येक जिल्ह्यात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट
वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातही बहुउपयोगी वृक्ष असलेल्या बांबू लागवडीला प्राधान्य दिले असून राज्यात २० लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येत आहे. तसेच मिलेट्सची लागवड वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात मिलेट्स क्लस्टर देखील आपण करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोटांना सांगितले.
'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले. तसेच यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसह फेर धरला तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह फुगडी देखील घातली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक अविनाश ढेकणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे यांची तिसरी पूजा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा एकनाथ शिंदे यांनी केली. सलग तिसर्या वर्षी पूजा करण्याचा योग त्यांच्या आयुष्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता, मुलगा डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला.












Click it and Unblock the Notifications