प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गालबोट लागलं; राज्यात 4 ठिकाणी गाड्यांवर दगडफेक, PHOTOS
Stone pelting at 4 places in the state on the last day of Maharashtra Assembly campaign : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस होता. मात्र, शेवटच्या दिवशी अखेर गालबोट लागले. कारण राज्यात शांतता भंग करणाऱ्या चार घटना समोर आल्या आहेत.
यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. तर दुसरी घटना अमरावतीमध्ये घडली. आमदार प्रताप अडसद यांच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेकीची घटना तर तिसरी घटना ही संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अपक्ष उमेदवारावर हल्ला व चौथी घटना ही नाशिकमधे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. यात देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
गंगापुरात अपक्ष उमेदवारावर जीवघेणा हल्ला
गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. गंगापूर तालुक्यातील लांजी परिसरात हा हल्ला झाला. या हल्ल्यात सुरेश सोनवणे यांच्यासह दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आ.अडसद यांच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेक
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रताप अडसद यांच्या बहीणीच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप अडसद यांच्या भगिनी अर्चना रोठे या कारने सातेफळ फाट्यावरुन जात असताना त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत.

नाशिकमध्ये भाजप-शरद पवार गट आमनेसामने
नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आज भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या गदारोळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या एका कार्यकर्त्याची गाडी देखील फोडली. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली.

जळगावमध्ये रॅलीत गोळीबार
जळगावमध्ये एका अपक्ष उमेदवार आज गोळीबार झाला. काही दिवसापूर्वी जळगावात अपक्ष उमेदवाराच्या रॅलीत गोळीबार झाला होता. तर नाशिक मध्ये काल वंचितच्या उमेदवाराचा अपघात झाला. तो हल्ला होता, असं वंचितच म्हणणं आहे.












Click it and Unblock the Notifications