मोठी बातमी..! मंत्रीमंडळातील एक रिक्त जागा जयंत पाटलांसाठी..? वाचा राजकारणात काय घडतंय
शरद पवार गटातील काही नेते हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी अनेकदा झाल्या होत्या. गेल्या आठवड्यातही जयंत पाटील हे शरद पवार गटात नाराज असल्याच्या बातम्या पुन्हा झळकल्या होत्या. विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही जयंत पाटलांचे, योग्य वेळी योग्य निर्णय... हे वाक्य अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं होतं. आता अजित पवार गटाच्या नेत्याच्या एका विधानाने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

मंत्रीमंडळात एक पद रिक्त
रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात ३३ मंत्र्यांनी कॅबिनेट तर ६ मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. म्हणजेच मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्रीपद अजूनही रिक्त आहे. आता हे रिक्तपद कुणासाठी ठेवलं गेलंय, याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. गेल्या मंत्रीमंडळात ३४ मंत्री होते. आता हे रिक्त पद शरद पवार गटातून अजित पवार गटात येणाऱ्या जयंत पाटलांसाठी ठेवलं आहे का, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
अमोल मिटकरींचा दावा
नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक मोठं विधान केलं. मिटकरी म्हणाले, गेल्यावेळीही त्यांच्यासाठी एक मंत्रीपद रिक्त ठेवलं होतं. मात्र लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यामुळे ते आले नाहीत. आताही एक मंत्रीपद रिक्त ठेवलंय. ती राखीव जागा वन डाऊनसाठी आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते लवकरच आमच्याकडे येतील.
भुजबळांबाबतही केला दावा
पत्रकारांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी छगन भुजबळांबाबतही एक मोठा दावा केला. ते म्हणाले, भुजबळ मंत्रीमंडळात नसल्याने ओबीसी समाज नाराज दिसला. मात्र भुजबळ लवकरच राज्यसभेवर जातील. कोण नाराज आहे, यावर चर्चा होण्यापेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झाला पाहिजे. त्या-त्या नाराजांसोबत त्यांचे नेते बोलतील.
जयंत पाटलांच्या चर्चा वाढल्या
गेल्या आठवड्यात झालेल्या विशेष अधिवेशनात जयंत पाटलांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांविषयी बोलताना जयंत पाटील यांनी त्यांचं माझ्यावर खूप लक्ष आहे, असं म्हटलं होतं. शिवाय दादा आपल्या पक्षात एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय... असं म्हणत त्यांनी एकच चर्चा उडवून दिली होती. जयंत पाटील खरंच शरद पवार गटात नाराज आहेत का, अशा चर्चांना त्यामुळे संधी मिळाली होती. आता पुन्हा मिटकरींच्या दाव्यामुळे जयंत पाटल्यांच्या अजित पवार गटात येण्याच्या चर्चा वाढल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications