महायुतीत अजूनही खदखद, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गृहमंत्रीपदावरुन शिंदे गटाला चिमटा, म्हणाले-ज्याचा...
Maharashtra Assembly Election 2024 : गत महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा असताना, गृहमंत्रीपद हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे, शिवसेना ह्या पदासाठी आग्रही आहे. त्यातच, आज पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये गृहमंत्रीपदावरुन चर्चा सुरू असल्याचं म्हटलं. त्यामुळे, गृहमंत्रीपदाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असते त्यांच्याकडेच आत्तापर्यंत राहिल्याचे सांगत, शिवसेनेला खोचक चिमटा घेतला.
अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. डॉ. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नाही. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद फडणवीसांकडेच राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.

त्यामुळे, मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे अमोल मिटकरी यांनी चिमटा काढला आहे. आधीच शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत, स्वत: एकनाथ शिंदे हेही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आपण नाराज नसून महायुतीचे केंद्रातील नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे, माझा व शिवसेनेचा त्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
निकालानंतर महायुतीत नेमका वाद कशावरुन?
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. भाजप नेताच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद भाजपला मिळत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाची आहे. मात्र, गृहमंत्रीपद हे देखील भाजपकडेच आणि मु्ख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याचा आग्रह असल्याची माहिती आहे.
.












Click it and Unblock the Notifications