अमित शहांनी भुजबळांना दिल्लीत बोलावलं..? शेजारी-शेजारी बसून रंगली खलबतं, चर्चा वाढली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी उभारलेल्या व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळही उपस्थित होते. अमित शाह यांनी छगन भुजबळांना त्यांच्या शेजारी बसायला सांगितले. या दोन्ही नेत्यांत काहीतरी गुप्त चर्चा झाली. या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नेमकं काय झालं?
मालेगाव येथील एका कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. याच कार्यक्रमाला छगन भुजबळही उपस्थित होते. अमित शहा मंचावर आले त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांना पाहून त्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्यास सांगितले. छगन भुजबळही त्यांच्या शेजारीच बसले. या कृतीमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु झाली.
भुजबळ काय म्हणाले?
अमित शहांशी काय चर्चा झाली, असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, अमित शहा साहेबांनी मला त्यांच्या शेजारी बसायला लावलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांच्या शेजारी बसल्यावर आमच्यात राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही. आज व्यंकटेश्वरा कृषि फार्मचा कार्यक्रम आहे, त्यावर चर्चा झाली. हे लोक तीन वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मला या फार्मबद्दल सांगितलं. पण मला त्यावेळी हे एवढं मोठं होईल, असं वाटलं नव्हतं, असंच मी शहांना सांगितल्याचं भुजबळांनी सांगितलं.
दिल्लीला येण्याचं आमंत्रण?
अमित शहांनी तुम्हाला दिल्लीत भेटायला बोलावलंय का, असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर भुजबळ म्हणाले, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तेथे कुणीही जावू शकतो. तुम्ही-आम्ही केव्हाही दिल्लीला जावू शकतो. भुजबळांच्या या प्रश्नानंतर मात्र अनेक तर्क काढण्यात आले. भुजबळांची बोलण्याची स्टाईल माहित असल्याने तुम्ही-आम्ही केव्हाही दिल्लीला जावू शकतो, याचा अर्थ शहांनी त्यांना दिल्लीत बोलावले, असेही त्यांच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
बॅनर्सवरुन घड्याळ गायब
या कार्यक्रमाला अमित शहा येणार असल्याने मालेगावात ठिकठिकाणी अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर अमित शहांसोबत फक्त छगन भुजबळ व समिर भुजबळ यांचेच फोटो होते. या बॅनरवर कोठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा घड्याळाचे चिन्ह नव्हते. वास्तविक हे बॅनर्स भुजबळ समर्थक व समीर भुजबळ युथ फाऊंडेशनने लावले होते, त्यामुळे बाकीचा उल्लेख नव्हता, असे सांगितले गेले.












Click it and Unblock the Notifications