अंबरनाथमध्ये 'महायुती'त बिघाडी; BJPची खेळी शिंदेंनी उलटवली; काँग्रेस फोडूनही भाजप सत्तेपासून दूर
Shinde shivSena NCP to Form Power in Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तेचा पेच अखेर सुटला असून, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे. काँग्रेसचे १० नगरसेवक फोडून बहुमताचा आकडा गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शह देत, श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. यामुळे अंबरनाथमध्ये आता 'शिवसेना-राष्ट्रवादी' युतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपची 'ऑपरेशन काँग्रेस' खेळी ठरली निष्फळ
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अंबरनाथमध्ये कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नव्हता. भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे २७ नगरसेवक होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने सुरुवातीला काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीनंतर भाजपने थेट काँग्रेसचे १० नगरसेवक फोडून त्यांना आपल्या गटात सामील करून घेतले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळेल, या आशेवर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्याची तयारी केली होती.
खासदार श्रीकांत शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'
भाजपच्या या हालचालींमुळे शिवसेनेत सुरुवातीला खळबळ उडाली होती. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने सूत्रे फिरवली. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या गोटात खेचले. शिवसेनेचे सर्व २७ नगरसेवक ठाण्यातील 'आनंद आश्रम' येथे एकत्र आले. शिवसेनेचे २७, राष्ट्रवादीचे ४ आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यासह ३२ जणांचे संख्याबळ श्रीकांत शिंदे यांनी जुळवले. आवश्यक बहुमताचा आकडा गाठल्यानंतर शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना सत्ता स्थापनेचे पत्र सादर केले असून भाजपची मोठी कोंडी केली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :
- पक्ष : नगरसेवक संख्या : स्थिती
- शिवसेना (शिंदे गट)२७ सत्तेत सहभागी
- राष्ट्रवादी (अजित पवार)०४ सत्तेत सहभागी
- अपक्ष ०१ शिवसेनेला पाठिंबा
- भाजप : १६
- विरोधी बाकावर
- काँग्रेस : १२ : १० नगरसेवक भाजपसोबत
दोस्तीत कुस्ती: महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी अंबरनाथमध्ये मात्र 'दोस्तीत कुस्ती' पाहायला मिळाली आहे. काँग्रेसचे नगरसेवक फोडूनही भाजपला सत्तेबाहेर राहावे लागल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे, सर्वात मोठा पक्ष असूनही आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला श्रीकांत शिंदे यांनी दिलेला हा इशारा मानला जात आहे.












Click it and Unblock the Notifications