अजित दादांचे वडील होते दिग्ग्ज व्यक्तिमत्व; बाॅलीवूडशी नाते व्ही. शांताराम यांच्यासोबत केलं होतं काम
Ajit Pawar's Father Anantrao Pawar The Untold Connection with Bollywood : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा देश हळहळत आहे. पवार कुटुंबाची ओळख संपूर्ण देशाला 'राजकीय घराणे' म्हणून आहे. मात्र, अजित दादांचे वडील अनंतराव पवार यांची ओळख राजकारणापलीकडे चंदेरी दुनियेतही होती, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातील हा 'सिनेमॅटिक' अध्याय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राजकमल स्टुडिओ आणि अनंतराव पवार
अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे बंधू होते. पवार कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी राजकारणाची वाट धरली असताना, अनंतरावांनी मात्र आपल्या करिअरची सुरुवात भारतीय चित्रपट सृष्टीपासून केली होती. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यासोबत काम केले होते.
मुंबईतील प्रसिद्ध 'राजकमल स्टुडिओ' मध्ये त्यांनी 'असिस्टंट सिनेमॅटोग्राफर' म्हणून आपली जबाबदारी पार पाडली होती. भारतीय सिनेमातील अजरामर ठरलेल्या 'झनक झनक पायल बाजे' आणि 'अमर भूपाली' यांसारख्या क्लासिक चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांचा मोलाचा सहभाग होता.
सिनेमा सोडून शेतीकडे वळले
मुंबईत काही काळ सिनेमा क्षेत्रात घालवल्यानंतर अनंतराव पवार पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजेच बारामतीला परतले. तिथे त्यांनी कौटुंबिक शेती व्यवसायात लक्ष घातले. त्यांनी केवळ शेतीच केली नाही, तर सहकार क्षेत्रातही योगदान दिले. ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणूनही कार्यरत होते.
अजित पवारांचा संघर्ष आणि वडिलांचे छत्र हरपले
अजित पवार लहान असतानाच अनंतराव पवार यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे अजित दादांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि अगदी तरुण वयात घराची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. याच संघर्षातून तावून सुलाखून निघालेले अजित पवार पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'दबंग' नेतृत्व म्हणून उदयास आले.
अजित पवारांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवलाली प्रवरा येथे झाला होता. त्यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि वडील अनंतराव पवार यांनी त्यांच्यावर शिस्तीचे संस्कार केले होते.












Click it and Unblock the Notifications