भ्रष्टाचार अन् कर्जाचा मुद्दा; अजित पवारांच्या आरोपांमुळे महेश लांडगेंच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का?
"सत्ता येते आणि जाते, पण सत्तेची नशा जेव्हा डोक्यात जाते, तेव्हा विनाश अटळ असतो..." असं काहीसं सध्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडतंयं. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच संघर्षाची ठिणगी पडली आहे. निमित्त होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धडाडती तोफ. एरवी संयमी आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी मात्र 'राक्षसी भूक', 'लुटारूंच्या टोळ्या' आणि 'खोदाई माफिया' अशा शब्दांत कडाडले. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा प्रत्येक बाण सध्याच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या म्हणजेच आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या दिशेनेच होता, हे सांगायला कोणत्याही राजकीय ज्योतिषाची गरज उरली नाही.

मैदानातून थेट आखाड्यात
पत्रकार परिषदेत अजित पवाांनी १९९२ पासूनचा शहराचा प्रवास मांडला. "मी शहर घडवलं, रस्ते सुसाट केले," असं त्यांनी सांगितलं. मात्र, २०१७ नंतर शहराचं जे 'आरोग्य' बिघडलं, त्याबद्दल त्यांनी जी आकडेवारी मांडली, ती थक्क करणारी आहे. महापालिकेच्या ४८४४ कोटींच्या ठेवी आज २ हजार कोटींवर आल्या आहेत. "जर एवढा पैसा खर्च झाला, तर तो गेला कुठे? रस्ते तर अरुंद झाले, मग ही माया कुणाच्या पदरात पडली?" हा त्यांचा प्रश्न थेट स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या 'प्रॉपर्टी' वाढीवर बोट ठेवणारा ठरला अशी जोरदार चर्चा आहे.
'खोदाई माफिया' आणि 'कुत्र्यांच्या नसबंदीचा' तो किस्सा!
अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना असा एक मुद्दा मांडला की उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. "कुत्र्याच्या नसबंदीतही पैसे खाल्ले," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. पिंपरीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची आठवण करून देत दादांनी स्थानिक नेतृत्वांच्या कार्यकाळातील 'पारदर्शकते'चे वाभाडे काढले. लँड माफिया आणि भंगार माफिया ऐकले होते, पण पिंपरी-चिंचवडमध्ये आता 'खोदाई माफिया' नावाचा नवीन प्रकार जन्माला आल्याचं त्यांनी सांगितलं. जिओ, एअरटेलच्या नावाखाली शहराची जी चाळण झाली, त्यातून कुणाचे खिसे भरले? हा प्रश्न त्यांनी हवेत सोडला असला, तरी त्याचे उत्तर आता मतदार शोधू लागले आहेत.
'सिनेस्टाईल' पाठलाग आणि सत्तेची मस्ती
निवडणुकीच्या निमित्ताने शहरात जे काही घडतंय, ते एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवणारं आहे. "आमच्या उमेदवारांचा सिनेस्टाईल पाठलाग केला जातो, त्यांना गाडीत कोंडून अर्ज मागे घ्यायला लावले जातात," असा गंभीर आरोप करत अजित पवारांनी शहरात भीतीचं वातावरण असल्याचं सूचित केलं. "सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे," असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला की, हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी बघतेय.
नाव न घेता महेश लांडगेंवर निशाणा?
राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती अजित पवारांनी केलेल्या 'हफ्तेखोरी' आणि 'प्रॉपर्टी वाढीच्या' आरोपांची. शहरात गेल्या नऊ वर्षात ज्यांची राजकीय ताकद वाढली, ज्यांच्याकडे शहराच्या विकासाची सूत्रं राहिली, त्यांच्याच दिशेने अजित पवारांचा रोख होता. अजित पवार विरुद्ध महेश लांडगे हा संघर्ष आता काय लपून राहिलेला नाही. विशेषतः 'अर्बन स्ट्रीट'च्या नावाखाली झालेला गोंधळ आणि त्यातून झालेली टक्केवारी यावर बोलताना पवारांनी स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "मी पुराव्याशिवाय बोलणार नाही," असं म्हणत त्यांनी भविष्यात मोठा स्फोट करण्याचे संकेतही दिले आहेत.
वात तर पेटलीये!
अजित पवारांनी प्रचाराची 'वात' तर पेटवली आहे. आता या आगीत कोणाचे राजकीय भवितव्य भस्मसात होणार आणि कोणाला जनमताचा कौल मिळणार, हे काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, पिंपरी-चिंचवडमधील ही निवडणूक आता केवळ 'विकास' विरुद्ध 'भ्रष्टाचार' राहिलेली नसून ती 'अस्मिता' विरुद्ध 'दडपशाही' अशा वळणावर येऊन ठेपली आहे. अजित पवारांच्या या आरोपांमुळे स्वच्छ अशी प्रतिमा असलेले आमदार महेश लांगडे काहीसे संशयाच्या फेऱ्यात सापडल्याचे मत जाणकार पत्रकार बोलून दाखवत आहेत.












Click it and Unblock the Notifications