Ajit pawar slams bjp:सत्तेची माज, मस्ती अन् नशा! पिंपरीत अजित पवारांचा भाजपवर भ्रष्टाचारावरून प्रहार
Ajit pawar slams bjp : "ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले, तेच आता विरोधकांचे उमेदवार झाले आहेत. भाजपच्या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झाली असून, शहरात लूट करणाऱ्यांच्या टोळ्या खुलेआम वावरत आहेत," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी सत्तेचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचे वाभाडे काढले.

ज्यांच्यावर आरोप झाले, तेच आता विरोधकांचे उमेदवार!
"१९९२ ते २०१७ या काळात पिंपरी-चिंचवडचा विकास जसा हवा होता, तसा आम्ही केला. या शहराचा कायापालट केल्यापासून आम्ही सातत्याने विकास करत आहोत आणि यासाठी आम्हाला अनेक ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वादही लाभले. २०१७ साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे माझे अनेक सहकारी, ज्यांना मी संधी आणि पदे दिली होती, ते माझ्यापासून दुरावले. त्यावेळी एक मुद्दा असा उपस्थित झाला होता की, विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये भ्रष्टाचार झाला. ज्या महापौरांवर त्यावेळी हे आरोप झाले होते, आता तेच आमच्या विरोधात असणाऱ्यांचे उमेदवार झाले आहेत," असे अजित पवार म्हणाले.
भाजपवर सडकून टीका आणि आरोप
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका करत गंभीर आरोप केले. पवार म्हणाले, "२०१७ पूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे ४ हजार ८४४ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, त्या आता २ हजार कोटींवर आल्या आहेत. या ठेवी वाढायला हव्या होत्या, मात्र त्या कमी झाल्या. हे सांगतानाच भाजपने कर्जरोखे काढून महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज लादले," असा आरोप त्यांनी केला. "जर एवढा पैसा खर्च केला, तर नक्की विकासकामे कुठे झाली?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
"भाजपची राक्षसी भूक, मनपाची वाट लावली!"
"भाजपच्या काळात 'रिंग' करून पैसे लाटले गेले, रस्ते अरुंद केले गेले आणि त्यामुळेच शहरात वाहतूक कोंडी वाढली," असे म्हणत भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, अशी टीका त्यांनी केली. अजित पवारांनी भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले की, "शहरातील काही विशिष्ट लोकांची संपत्ती इतकी कशी वाढली? त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून?"
सत्तेची माज, मस्ती आणि नशा
अजित पवारांनी भाजपवर आरोप करतानाच कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामातही पैसे खाल्ल्याचा दावा केला. "सत्ताधाऱ्यांना सत्तेची माज, मस्ती आणि नशा चढली आहे," असे म्हणत त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. पिंपरीत आधीच जमीन आणि भंगार माफिया सक्रिय असताना आता 'खोदाई माफिया' आल्याचे सांगत, शहरात लुटारूंच्या टोळ्या भरदिवसा वावरत असल्याचे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचारामुळे पिंपरी महापालिका बरबटली असून भाजपने महापालिकेला कर्जबाजारी केल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications