अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण: बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा; रोहित पवारांची पोलिसांशी बाचाबाची
Ajit Pawar plane crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील ताजी घडामोड म्हणजे बारामती शहर पोलीस ठाण्यात झालेला अभूतपूर्व गोंधळ. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीकर रस्त्यावर उतरले असून, संबंधित विमान कंपनी आणि डीजीसीए (DGCA) विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ताकदीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पोलिसांच्या नकारामुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे.

पोलिसांसोबत दीड तास खडाजंगी
काल मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादावादीनंतर, आज रोहित पवार आपल्या समर्थकांसह बारामती पोलीस ठाण्यात धडकले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १ तास २५ मिनिटांहून अधिक काळ रोहित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आणि वादावादी सुरू होती. रोहित पवार यांनी तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत 'एफआयआर' (FIR) का दाखल व्हावा, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
ज्या अजित दादांनी बारामती घडवली त्याच अजित दादांच्या न्यायासाठी बारामतीत संघर्ष करावा लागत आहे.आज पोलिसांवर FIR घेऊ नये म्हणून दबाव टाकण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर येत असेल तर समजून घेण्याची वेळ आहे की अजित दादांचा घात म्हणजे घातच आहे. @RRPSpeaks#JusticeForAjitDada pic.twitter.com/GYIA8zromO
— विजय (@maratha5250) February 26, 2026
'क्रिमिनल नेग्लिजन्स'चा ठपका, तरीही गुन्हा का नाही?
युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डीजीसीए (DGCA) च्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, हा अपघात 'क्रिमिनल नेग्लिजन्स' (गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा) आणि विमानाची योग्य देखभाल (Maintenance) न केल्यामुळे झाला आहे.
"जर सरकारी यंत्रणेचा रिपोर्टच निष्काळजीपणाकडे बोट दाखवत असेल, तर व्हीएसआर (VSR) विमान कंपनीवर गुन्हा दाखल का केला जात नाही? हा घातपाताचा संशय बळावणारा प्रकार आहे," असा सवाल युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला.
सीबीआय चौकशीचे कारण देत पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप
बारामती पोलिसांनी हा तपास आधीच सीबीआय (CBI) कडे वर्ग करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे समजते. मात्र, रोहित पवार आणि त्यांच्या वकिलांच्या मते, स्थानिक स्तरावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
बारामतीकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली
अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी जनतेच्या भावना मांडताना सांगितले की, माहिती देण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने लोकांच्या मनात शंका बळावत आहेत.
ब्लॅक बॉक्सचा मुद्दा : विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' जळाला असल्याचे सांगितले जात आहे, ही बाब तांत्रिकदृष्ट्या संशयास्पद वाटत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
शक्तींचा दबाव : काही अदृश्य शक्ती हा गुन्हा दाखल होऊ देत नसल्याचा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
सद्यस्थिती काय?
सध्या बारामती पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची मोठी गर्दी असून 'अजित दादांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. रोहित पवार अजूनही पोलिसांना कायद्याचा कीत्ता गिरवून दाखवत असून गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे न हटण्याच्या पवित्र्यात आहेत.
हा केवळ अपघात आहे की एखादा मोठा कट? डीजीसीएचा रिपोर्ट समोर असतानाही कारवाईला होणारा विलंब कुणाला वाचवण्यासाठी आहे? असे अनेक प्रश्न आता बारामतीच्या मातीतून उपस्थित केले जात आहेत.












Click it and Unblock the Notifications