काका अजित पवारांना नडणारे पुतणे युगेंद्र पवारांचा झालाय साखरपुडा, कोण आहे त्यांची होणारी पत्नी?
Yugendra Pawar Engagement News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघात नडणारे त्यांचे पुतणे व आजोबा शरद पवार यांचे विश्वासू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला आहे. यासंदर्भातील माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यामुळे पवार फॅमिलीत यंदा दोन जणांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. त्याला एक ते दीड महिना होत नाही तोच आता अजित पवारांचे पुतणे तथा त्यांचे राजकीय विरोधक युगेंद्र पवार सुद्धा विवाह बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये फोटो शेअर करत दिली आहे.

कोण आहे युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी?
मिळालेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव तनिष्का प्रभू आहे. ती मुंबईची आहे. तिचं शिक्षण परदेशामध्ये झालेलं आहे. तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतलं आहे. तर नुकताच युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा घरगुती कार्यक्रमात पार पडलाय.
एप्रिल महिन्यात पवार कुटुंब आले होते एकत्र!
युगेंद्र आणि तनिष्का यांचा घरगुती पद्धतीने साखरपुडा नुकताच पार पडलाय. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती शेअर केली. दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा झाला होता. यावेळी पवार कुटुंबीय एकत्र जमले होते.
युगेंद्र यांनी आजोबा शरद पवारांचा ऐकला सल्ला!
मिळालेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय? अशी विचारणा केली होती. आजोबांचा सल्ला मनावर घेत युगेंद्र पवार यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस मधून दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.
जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील कोण आहे?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे जिरंजीव जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता. या साखरपुड्याच्या निमित्ताने राजकारणामुळे दुभंगलेलं कुटुंब एकत्र आले होते. सुप्रिया सुळे यांनी साखरपुडा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते.












Click it and Unblock the Notifications