मुंबईत अजितदादांची 'स्वबळा'ची डरकाळी! 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मलिक कुटुंबातील तिघांना तिकीट
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचे रणांगण आता खऱ्या अर्थाने तापू लागले आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांना धक्का देत आपल्या ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत राष्ट्रवादीने 'स्वबळा'चा नारा दिला असून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देऊन आपली ताकद अजमावण्याचे ठरवले आहे.

नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबईची धुरा
अजित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि त्यांच्या कन्या आमदार सना मलिक यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीने मुंबईत एकूण १०० जागा लढवण्याचे संकेत दिले असून, पहिल्या टप्प्यात ३७ जागांवर शिक्कामोर्तब केले आहे. या उमेदवारांना उद्यापासूनच अधिकृत 'एबी फॉर्म' (AB Form) दिले जाणार आहेत.
एकाच घरातून तीन उमेदवार: मलिक कुटुंबाचा दबदबा
या पहिल्या यादीत सर्वात जास्त चर्चा नवाब मलिक यांच्या कुटुंबाची होत आहे. भाजपने नवाब मलिक यांच्या नावावर वारंवार आक्षेप घेतलेला असतानाही, अजित पवारांनी मलिक यांच्या जवळच्या नातेवाईकांना संधी दिली आहे:
कप्तान मलिक (भाऊ) : प्रभाग क्रमांक १६५ (कुर्ला परिसर).
डॉ. सईदा खान (बहीण) : प्रभाग क्रमांक १६८.
बुशरा नदीम मलिक (कप्तान मलिक यांची सून) : प्रभाग क्रमांक १७०.
पहिल्या यादीतील काही प्रमुख उमेदवार आणि प्रभाग
- प्रभाग क्र. : उमेदवार
- ३ : मनीष दुबे
- ८६ : सुभाष पाताडे
- ४८ : सिरील पिटर डिसोझा
- ९३ : डॉ. सचिन तांबे
- ६२ : अहमद खान
- ९६ : आयेशा शाम्स खान
- ७६ : बबन रामचंद्र मदने
- १६५ : कप्तान मलिक
- १७१ : दिशा अमित मोरे
- २२४ : सबिया अस्लम मर्चंट
महायुतीत बिघाडी की रणनीती?
अजित पवारांच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये (भाजप-शिंदे शिवसेना-राष्ट्रवादी) मुंबईत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २०७ जागांवर एकत्र येण्याबाबत चर्चा करत असताना, अजित पवारांनी स्वतंत्र उमेदवार देऊन आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी (SP) आधीच ठाकरे बंधूंसोबत १०-१२ जागांवर तडजोड करून मैदानात उतरली आहे, त्यामुळे 'घड्याळ' विरुद्ध 'तुतारी' असा सामनाही काही वॉर्डांत पाहायला मिळेल.
आघाड्यांची सद्यस्थिती
- ठाकरे युती + शरद पवार: जागावाटप अंतिम टप्प्यात, १०-१२ जागा राष्ट्रवादीला (SP).
- भाजप + शिंदे शिवसेना: २०७ जागांवर एकमत, उर्वरित २० जागांसाठी चर्चा सुरू.
- अजित पवार राष्ट्रवादी: १०० जागा लढवण्याचा मानस, ३७ उमेदवार जाहीर.












Click it and Unblock the Notifications