Bapu Nair : खळबळजनक! पुण्यात गुन्हेगारांचे 'अच्छे दिन'? बापू नायरला उमेदवारी मिळाल्याने नागरिक भयभीत
पुणे: राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय नेहमीच चर्चेत असतो, मात्र आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पार्श्वभूमीवर या चर्चेने उग्र रूप धारण केले आहे. अजित पवार गटाने पुण्यातून जाहीर केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये अशा एका नावाची चर्चा सध्या संपूर्ण शहरात रंगतेय, ज्याच्या नावाने एकेकाळी पुण्याचा दक्षिण भाग थरथरायचा. तो म्हणजे कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर (Bapu Nair).

अजित पवार गटाने बापू नायरला प्रभाग क्रमांक ३९ मधून मैदानात उतरवले असून, या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठू लागली आहे.
कोण आहे हा बापू नायर? (प्रवास: चालकापासून टोळीप्रमुखापर्यंत)
मूळचा केरळमधील वायनाडचा असलेला नायर परिवार उदरनिर्वाहासाठी पुण्यात स्थायिक झाला. बापू नायरने आपले शालेय शिक्षण बिबवेवाडी परिसरात पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने कार चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, एका किरकोळ वादाने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
- पहिला गुन्हा: २००१ मध्ये एका मित्राच्या हत्येप्रकरणी बापू नायरवर सहकारनगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला.
- टोळीचे वर्चस्व: या पहिल्या गुन्ह्यानंतर बापू मागे वळला नाही. त्याने बिबवेवाडी, कोंढवा, धनकवडी आणि सहकारनगर भागात स्वतःची टोळी तयार केली. खंडणी, मारामारी आणि खुनाचे प्रयत्न अशा गुन्ह्यांमुळे तो या भागाचा अनभिषिक्त 'भाई' बनला.
वर्चस्ववाद आणि रक्तरंजित इतिहास
बापू नायरच्या गुन्हेगारी प्रवासातील सर्वात मोठे वळण म्हणजे बैजु नवघणे हत्याकांड. २०११ मध्ये नवरात्रीच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून नायर टोळीने नवघणेची हत्या केली. या प्रकरणामुळे पुण्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर 'मोक्का' (MCOCA) लावण्यात आला होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे पुढे त्याची निर्दोष मुक्तता झाली.
मारटकर हत्या प्रकरण आणि ससून कनेक्शन
बापू नायरच्या गुन्हेगारी कुंडलीतील सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे शिवसेना (युवासेना) नेते दीपक मारटकर यांची हत्या. बापू नायर जेव्हा २०१५ पासून तुरुंगात होता, तेव्हा ससून रुग्णालयात तपासणीसाठी आला असताना त्याने मुख्य आरोपी स्वप्नील मोढवे याची भेट घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या कटकारस्थानामुळे त्याला पुन्हा अटक झाली होती. सध्या तो २०२४ मध्ये या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे.
अजित पवार गटाकडून 'गुन्हेगारांना' ताकद?
केवळ बापू नायरच नव्हे, तर अजित पवार गटाने पुण्यात इतरही वादग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांना संधी दिली आहे:
- गजा मारणेची पत्नी (जयश्री मारणे)
- बंडू आंदेकरची सून (सोनाली आंदेकर)
- बंडू आंदेकरची भावजय (लक्ष्मी आंदेकर)
बापू नायरवर 'मोक्का' सारखे गंभीर गुन्हे असतानाही त्याला अधिकृत उमेदवारी दिल्याने, महापालिका निवडणुकीत 'विकास' की 'दहशत' असा प्रश्न पुणेकर नागरिक विचारत आहेत.












Click it and Unblock the Notifications