लेकासाठी व्याकुळ माऊली! केबल तोडली, मोबाईल 'फ्लाइट मोड'वर टाकला; फार्महाऊसवरील 'तो' थरारक प्रसंग
Ajit Pawar death Mother emotional story : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, त्यांच्या काटेवाडी येथील फार्महाऊसवरून समोर आलेली एक माहिती काळजाला चटका लावणारी आहे. आपल्या लाडक्या 'दादा'च्या निधनाची वार्ता त्यांच्या वृद्ध मातोश्रींना कळू नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेली धडपड आणि लेकाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेली आई, असा हृदयद्रावक प्रसंग तिथे घडला.

सकाळी 8:30 वाजता बातमी झळकली आणि...
अजित पवारांच्या फार्महाऊसचे व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी या घटनेचा थरार सांगितला. नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई सकाळी ७ वाजता टीव्ही पाहत होत्या. साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची 'ब्रेकिंग न्यूज' झळकली. आईंनी ती बातमी पाहिली आणि घाबरून कर्मचाऱ्यांना विचारले, "अरे, दादाचा अपघात झालाय का?" सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित थोडेफार खरचटले असेल, काळजी करण्यासारखे काही नसेल.
केबल तोडली, मोबाईल 'फ्लाइट मोड'वर टाकला
विमान अपघाताची भीषणता जसजशी स्पष्ट होऊ लागली, तसतसे फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. आईंना ही धक्कादायक बातमी समजू नये म्हणून व्यवस्थापकांनी तातडीने टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बिघडल्याचे सांगितले. एवढेच नाही तर, त्यांच्या मोबाईलवर कोणाचा फोन येऊ नये म्हणून तो 'फ्लाइट मोड'वर टाकून दिला. मात्र, माऊलीचे हृदय लेकाच्या काळजीने आधीच ओळखून होते.
लेकाला भेटण्यासाठी माऊली चालतच निघाली!
"दादांना हॉस्पिटलमध्ये नेले आहे," एवढे ऐकल्यानंतर आई शांत बसणे शक्यच नव्हते. "चला, मला दादाला भेटायला घेऊन चला," असा त्यांनी लकडा लावला. कर्मचाऱ्यांनी वेळ मारून नेण्यासाठी 'गाडी बंद पडली आहे' असे सांगितले. मात्र, लेकाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली ही माऊली कोणाचेही न ऐकता फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाली. अखेर त्यांचा तो अवतार पाहून नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी त्यांना गाडीतून बारामती येथील 'सहयोग' बंगल्यावर नेले.
चार दिवसांपूर्वीच झाली होती शेवटची भेट
अजितदादा कितीही व्यस्त असले तरी आईच्या भेटीसाठी वेळ काढत असत. अवघ्या चार दिवसांपूर्वी, शनिवारी सकाळी ७:३० वाजता दादा आईला भेटायला फार्महाऊसवर आले होते. तिथे त्यांनी आईसोबत पाऊण तास गप्पा मारल्या, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जाता जाता त्यांनी शेतातील कामगारांना नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. कोणालाही कल्पना नव्हती की ही आई आणि लेकाची शेवटची भेट ठरेल.












Click it and Unblock the Notifications