लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता; वाचा- कधीपर्यंत करता येणार अर्ज
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची व मोठी बातमी हाती आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने त्यांच्या खात्यात रक्कम मिळणार आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?
आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येईल. अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे, अशा त्या म्हणाल्या.
आतापर्यंत योजनेची स्थिती कशी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते आलेले आहेत. या दोन हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले आहेत. सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आले होते. तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते. आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे. यातून तिसरा हप्ता दिला जाणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे.












Click it and Unblock the Notifications