धक्कादायक! २२ दिवसांच्या बाळाला दिले ६५ चटके; 'त्या' गावात अंधश्रद्धेतून केला भयानक प्रकार
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तहसीलमधील सिमोरी या दुर्गम गावात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. एका २२ दिवसांच्या बाळाच्या पोटात गरम लोखंडी रॉडने जखम केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. अंधश्रद्धेमुळे मुलावर उपचार करण्याच्या नावाखाली हे अमानुष कृत्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर मेळघाटच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान, या जखमी बाळावर सध्या अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र याबाबत पोलिसांना काही माहिती आहे की नाही, हे समजू शकलेले नाही.

अंधश्रद्धेतून घडला प्रकार
चिखलदऱ्याच्या दुर्गम भागात धारणीपासून ९० किमी अंतरावर सिमोरी गाव आहे. या दुर्गम गावात दोन दिवसांपूर्वी एक गंभीर घटना उघडकीस आली. एका २२ दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटावर ६५ वेळा वार करण्यात आले. लोखंडी सळई गरम करुन या बाळाच्या पोटावर चटके देण्यात आले. उपचाराच्या नावाखाली हे सगळे घडल्याचे सांगितले जाते.
जनजागृतीवर प्रश्नचिन्ह
नागपूर विभागातील अनेक गावे हे दुर्गम आहेत. आदीवासी पाड्यांवर अनेकदा अंधश्रद्धेचे प्रकार उघडकीस आले आहेत. मेळघाटच्या दुर्गम भागात गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेचे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. येथे अघोरी विद्या वापरून उपचार केले जात असल्याचे सांगितले जात आहे. आदिवासी माता अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. दरम्यान सिमोरी गावातील या परिस्थितीमुळे मेळघाटच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि जनजागृती करणाच्या सरकारच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
बालकावर उपचार सुरु
२२ दिवसांच्या बाळावर चटके देऊन उपचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, मुलाला प्रथम अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथील रुग्णालयात बाळाला हलविण्यात आले. अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. या संदर्भात आरोग्य विभागाकडून माहिती मागितली असता, उपचार व्यवस्थित सुरू असल्याचे सांगण्यात आले.












Click it and Unblock the Notifications