बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराचे सत्र काही थांबेना; सुनामगंजात 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या!
Bangaladesh Hindu issue : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. 8 जानेवारी 2026 रोजी सुनामगंज जिल्ह्यात 19 वर्षीय हिंदू तरुण जॉय महापात्रो याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

विष पाजून हत्येचा आरोप
पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक व्यक्तीने जॉय महापात्रो याच्यावर प्रथम अमानुषपणे हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केल्यानंतर, आरोपीने त्याला बळजबरीने विष प्राशन करण्यास भाग पाडले. गंभीर अवस्थेत जॉयला सिल्हेट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
गेल्या आठवड्यातील हत्येचे सत्र
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. जॉयच्या हत्येपूर्वी काही प्रमुख घटना खालीलप्रमाणे घडल्या आहेत:
मोनी चक्रवर्ती (६ जानेवारी २०२६): नरसिंगदी जिल्ह्यातील पलाश उपजिल्ह्यात ४० वर्षीय मोनी चक्रवर्ती यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
प्रताप (५ जानेवारी २०२६): जेसोर जिल्ह्यातील एका हिंदू व्यापाऱ्याची आणि वृत्तपत्र संपादकाची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. त्यांना कारखान्यातून बोलावून एका गल्लीत नेऊन संपवण्यात आले.
दिपू चंद्र दास (१८ डिसेंबर २०२५): मैमनसिंग जिल्ह्यातून या हिंसाचाराच्या लाटेला सुरुवात झाली. 'ईश्वरनिंदे'चा खोटा आरोप लावून एका कट्टरपंथी जमावाने दिपूची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला.
खोकन चंद्र दास: या ५० वर्षीय हिंदू व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आले होते, ज्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ऑक्टोबर २०२५ पासून बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर हिंदू घरांवर, मंदिरांवर आणि व्यक्तींवर होणारे हल्ले वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या घटनांचा निषेध केला असला तरी, स्थानिक पातळीवर हिंदूंची सुरक्षा धोक्यात आली आहे. व्यवसायानिमित्त बाहेर पडणारे व्यापारी असोत किंवा तरुण, सर्वांनाच कट्टरपंथीयांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.












Click it and Unblock the Notifications