डोनाल्ड ट्रम्प यांचे One Big Beautiful Bill काय आहे?, अमेरिका ते इंडियापर्यंत का उडाला गदारोळ?
Donald Trump One Big Beautiful Bill : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच 'वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट' नावाचे एक नवीन विधेयक सादर केले आहे. हा प्रस्ताव केवळ अमेरिकेतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनला आहे. चला तर जाणून घेऊया या बीलाविषयी, यातून भारतीय लोकांना कसा फटका बसू शकतो, तसेच अमेरिकेतील लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याविषयी सर्व काही.
या विधेयकाचा नेमका उद्देश काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या 'वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट या विधेयकाचा मुख्य उद्देश 2017 मध्ये लागू करण्यात आलेल्या कर कपाती कायमस्वरूपी करणे आहे. या विधेयकात सीमा सुरक्षा मजबूत करणे, सरकारी खर्चात कपात करणे आणि कर प्रणालीत व्यापक सुधारणा करणे यासारख्या महत्त्वाच्या प्रस्तांवाचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने दावा केला आहे की, हे विधेयक आर्थिक विकासाला गती देईल आणि करदात्यांना देखील दिलासा देणार आहे.
परंतु, या विधेयकात समाविष्ट असलेल्या काही तरतुदींमुळे आता अमेरिकेपासून ते भारतासह विविध देशांमध्ये देखील वाद विवाद निर्माण झाला आहे. विशेषतः, अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरित नागरिकांनी त्यांच्या मूळ देशात पैसे पाठवले तर त्यांच्यावर 5 % कर लादला जाईल. ही तरतूद विशेषतः भारतीय, मेक्सिकन आणि इतर स्थलांतरित समुदायांसाठी गंभीर चिंतेचे कारण बनली आहे, कारण त्याचा त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक आधारावर थेट परिणाम होऊ शकतो.

'One Big Beautiful Bill' मध्ये नेमकी काय आहे डोकेदुखी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या 'वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट' या विधेयकामुळे अमेरिकन राजकारणात आणि जागतिक स्तरावर अनेक वाद निर्माण झाले आहेत. या विधेयकात समाविष्ट असलेल्या काही तरतुदी अशा आहेत की त्यावर बरीच टीका होत आहे. नेमका कोणाला याचा फटका सहन करावा लागेल, ते खालील मुद्द्याच्या आधारावर आपणास समजून येईल..
स्थलांतरित नागरिकांनी परदेशात पाठवलेल्या पैशावर 5% कर
सर्वात मोठा वाद या प्रस्तावावर आहे. स्थलांतरितांनी त्यांच्या कुटुंबांना पाठवलेल्या पैशावर (रेमिटन्स) कर लादण्याबद्दल ते बोलत आहे. भारत, मेक्सिको, फिलीपिन्स आणि आफ्रिकन देशांतील लाखो स्थलांतरितांना याचा परिणाम होईल. हे विधेयक स्थलांतरविरोधी म्हणून वर्णन केले जात आहे.
सामाजिक योजनांवरील खर्चात कपात
मेडिकेड, फूड स्टॅम्प, आरोग्यसेवा अनुदान यासारख्या योजनांवरील खर्च कमी करण्याचा प्रस्ताव आहे. याचा थेट परिणाम कमी उत्पन्न गट आणि वृद्धांवर होऊ शकतो. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की हे गरिबांसाठी धक्का आहे.
सीमा सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रित करणे
अमेरिका-मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. ट्रम्पचा जुना ""Build the Wall" अजेंडा पुन्हा पुढे नेण्यात आला आहे. तो वांशिक विभाजन आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनांशी जोडला जात आहे.
श्रीमंत आणि कॉर्पोरेट क्षेत्राला होणार फायदा
कर कपातीचा मोठा भाग कॉर्पोरेट आणि श्रीमंत वर्गाला फायदा देतो. मध्यम आणि निम्न वर्गाला तुलनेने कमी लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की यामुळे आर्थिक असमानता आणखी वाढेल.
आरोग्यसेवा आणि ओबामाकेअरवर होणारा परिणाम
या विधेयकाद्वारे Affordable Care Act (सामान्यतः ओबामाकेअर म्हणून ओळखले जाते) काही महत्त्वाच्या तरतुदी कमकुवत होण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा अनुदानात कपात करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे गरीब आणि निम्न-मध्यम वर्गातील लोकांना विमा खरेदी करणे कठीण होऊ शकते. जर हे प्रस्ताव लागू केले गेले तर लाखो अमेरिकन नागरिकांना धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्याचा सार्वजनिक आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications