कुप्रसिद्ध 'हिंडेनबर्ग'चे दुकान बंद; डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरल्याची चर्चा, अदानींचे शेअर्स तेजीत
गौतम अदानी यांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक करणारी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च बंद झाली आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी स्वत: याची घोषणा केली आहे. अँडरसन यांनी कंपनी बंद करण्यामागची कारणे स्पष्ट केलेली नसली तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार असल्याने कदाचित कंपनीने हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय घेतला कंपनीने निर्णय?
हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याच्या निर्णयाबद्दल कंपनीचे संस्थापनक अँडरसन म्हणाले की, 'कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही. कोणताही विशिष्ट धोका नाही. कोणतीही आरोग्य समस्या नाही आणि कोणतीही मोठी वैयक्तिक समस्या नाही. एकदा मला कोणीतरी सांगितले होते की एका विशिष्ट टप्प्यावर यशस्वी करिअर ही एक स्वार्थी कृती बनते. वैयक्तिक कारकिर्दीत अनेक त्याग करावे लागल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे अँडरसन यांनी सांगितले.
कुप्रसिद्ध होती कंपनी
हिंडेनबर्ग रिसर्च, त्याच्या शॉर्ट-सेलिंग क्रियाकलापांसाठी कुप्रसिद्ध होती. या कंपनीने अदानी आणि इतर अनेक अब्जाधीशांचे प्रचंड नुकसान केले आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी 15 जानेवारीला याची घोषणा केली. अँडरसन म्हणाले, "मी गेल्या वर्षीच्या अखेरीस कुटुंब, मित्र आणि आमच्या कार्यसंघासह सामायिक केले होते की मी हिंडेनबर्ग संशोधन विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की चौकशीच्या कल्पना पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करण्याची योजना होती. फर्मने अलीकडेच पॉन्झी योजनांशी संबंधित अंतिम प्रकल्प पूर्ण केले. यानंतर कंपनीचे संशोधन कार्य संपले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांना कंपनी घाबरली?
हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याची अँडरसनची घोषणा धक्कादायक होती. अँडरसन यांनी हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्यामागचे कोणतेही कारण सांगितले नाही. मात्र येत्या काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये येणार आहे. त्यामुळे कंपनीने बंदचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरून घेतलाय का, असे प्रश्नही आता उपस्थित होऊ लागले आहेत.
अदानींचे शेअर्स तेजीत
अदानी समुहाच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीत दिसले. या ग्रुपची फ्लेगशिप कंपनी अदानी इंटरप्रायजेसचे शेअर्स आज सुरुवातीच्या काही मिनिटांतच ४.३५ टक्क्यांनी वाढलेले दिसले. हे शेअर्स आता २,४९२.१५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बाकीच्या शेअर्समध्येही कमालीची तेजी दिसून आली आहे. हिंडेनबर्ग ही कुप्रसिद्ध कंपनी बंद झाल्याचा फायदा अदानी समुहाला मिळत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications