संघर्ष शिगेला; रशियन जहाजाच्या जप्तीनंतर पुतिन यांच्या सहकाऱ्याची ट्रम्पांना अणुहल्ल्याची धमकी!
Russian tanker seized by US : जागतिक राजकारणात सध्या रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव एका नव्या आणि भयंकर वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेने रशियन ध्वजांकित तेल टँकर 'मरीनेरा' जप्त केल्यानंतर दोन्ही महासत्तांमध्ये अटलांटिक महासागरात संघर्षाची ठिणगी पडली आहे. या कारवाईमुळे संतापलेल्या रशियाने आता थेट अण्वस्त्रांच्या वापराची भाषा सुरू केली असून, पुतिन यांचे खंदे समर्थक आणि रशियन खासदार अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अमेरिकेला "बुडवून टाकण्याची" धमकी दिली आहे.

समुद्रातील 'चाचेगिरी' आणि रशियाचा संताप!
रशियन संरक्षण व्यवहारांवरील राज्य समितीचे उपाध्यक्ष अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, "ज्या टँकरवर रशियाचा राष्ट्रध्वज फडकत आहे, त्यावर कारवाई करणे म्हणजे थेट रशियन भूभागावर हल्ला करण्यासारखे आहे. अमेरिका सध्या सत्तेच्या आणि अरेरावीच्या नशेत असून त्यांना फक्त लष्करी भाषेतच उत्तर दिले पाहिजे."
झुरावलेव्ह यांनी रशियाला आवाहन केले आहे की, त्यांनी टॉर्पेडो हल्ला करून ही कारवाई करणाऱ्या अमेरिकन तटरक्षक दलाची जहाजे समुद्रात बुडवावीत. त्यांच्या मते, अमेरिकेला रोखण्याचा हाच एकमेव मार्ग उरला आहे.
"अणुहल्ला करण्यास आमचे लष्करी धोरण सक्षम"
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, झुरावलेव्ह यांनी रशियाच्या लष्करी सिद्धांताचा (Military Doctrine) हवाला देत अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेने समुद्रात चाचेगिरीचा मार्ग अवलंबला आहे. जेव्हा राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो, तेव्हा आमचे लष्करी धोरण अण्वस्त्रांचा वापर करण्यास परवानगी देते. रशियन टँकर जप्त करणे ही छोटी घटना नसून तो आमच्या अस्मितेवर हल्ला आहे."
'मरीनेरा' टँकर आणि व्हेनेझुएला कनेक्शन
अमेरिकेच्या दाव्यानुसार, त्यांनी उत्तर अटलांटिक आणि कॅरिबियन समुद्रात दोन मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये व्हेनेझुएलाशी संबंधित दोन तेल टँकर जप्त करण्यात आले. रशियन ध्वज असलेला 'मरीनेरा' (ज्याला बेला-१ म्हणूनही ओळखले जाते) हा टँकर इराण आणि व्हेनेझुएलातून प्रतिबंधित तेलाची वाहतूक करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
अमेरिकन ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांनी 'X' वर माहिती दिली की, जप्त केलेल्या जहाजावरील क्रू सदस्यांविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाईल. या कर्मचाऱ्यांनी अमेरिकन तटरक्षक दलाला चकवा देण्याचा आणि प्रतिबंधित तेल वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
रशियाची भूमिका आणि इशारा
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाने अमेरिकेकडे खालील मागण्या केल्या आहेत.
- टँकरवर असलेल्या रशियन नागरिकांना तात्काळ मानवीय वागणूक द्यावी.
- त्यांच्या हक्कांचा आदर राखला जावा.
- सर्व रशियन क्रू सदस्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे मायदेशी पाठवावे.












Click it and Unblock the Notifications