"दहशतवाद कोणत्याही स्वरूपात स्वीकारार्ह नाही!"; इस्रायलच्या भूमीवरून PM मोदींचा PAKला इशारा!
PM Modi in Israel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यादरम्यान जागतिक मंचावरून दहशतवादाविरुद्ध कडक शब्दांत प्रहार केला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदींनी स्पष्ट केले की, आधुनिक जगात दहशतवादाला कोणतेही स्थान नाही. पाकिस्तानचे थेट नाव न घेता, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला.

PM मोदींच्या भाषणातील मुद्दे : मैत्री अन् धोरणात्मक भागीदारी
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात 'शालोम' या हिब्रू अभिवादनाने केली आणि इस्रायलने केलेल्या उबदार स्वागताबद्दल आभार मानले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत.
नेसेट पदक समर्पण: काल नेसेटमध्ये (इस्रायलची संसद) मिळालेला सन्मान मोदींनी १.४ अब्ज भारतीय नागरिक आणि भारत-इस्रायल मैत्रीला समर्पित केला.
धोरणात्मक भागीदारी : दोन्ही देशांमधील संबंधांना आता 'विशेष धोरणात्मक भागीदारी' असा ऐतिहासिक दर्जा देण्यात आला आहे.
मुक्त व्यापार करार (FTA): भारत आणि इस्रायल लवकरच परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देणार आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला नवी गती मिळेल.
#WATCH | Jerusalem | Addressing a joint press briefing with Israel PM Benjamin Netanyahu, PM Modi says," We will soon give final shape to a mutually beneficial Free Trade Agreement." pic.twitter.com/Xm42vsLpsu
— ANI (@ANI) February 26, 2026
दहशतवादावर कडक प्रहार: पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा
पंतप्रधान मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, "भारत आणि इस्रायलचे हे धोरण स्पष्ट आहे की दहशतवाद कोणत्याही स्वरूपात सहन केला जाणार नाही. जे दहशतवाद्यांना आश्रय देतात किंवा त्यांना खतपाणी घालतात, त्यांना परिणामांना सामोरे जावेच लागेल." या विधानातून त्यांनी सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींना (पाकिस्तानला) त्यांची जागा दाखवून दिली आहे.
नेतान्याहू म्हणाले-तुमचे भाषण हृदयाला स्पर्शून गेले
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि मैत्रीचे तोंडभरून कौतुक केले. नेतान्याहू यांच्या भाषणातील ठळक वैशिष्ट्ये.
भावनिक संवाद: "मोदीजी, तुमचे कालचे नेसेटमधील भाषण ऐकून इस्रायलमधील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते. ही भेट छोटी असली तरी ती अत्यंत उत्पादक आणि हृदयस्पर्शी होती," असे नेतान्याहू म्हणाले.
भविष्य 'नवोन्मेषाचे' (Innovation) : "भविष्य हे त्यांचेच आहे जे नवनवीन प्रयोग (Innovation) करतील. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांना आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान आहे, पण आपण भविष्याचा ताबा घेण्यासाठी सज्ज आहोत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण आणि AI : शिक्षणात अचूकता आणण्यासाठी सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखण्यावर त्यांनी भर दिला.
एकत्रित वाटचालीचा निर्धार!
या भेटीमुळे भारत आणि इस्रायलमधील संरक्षण, शेती, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांतील सहकार्य एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. "आम्ही भूतकाळाचा अभिमान बाळगतो, पण भविष्याचा ताबा घेण्यासाठी एकत्र काम करण्याचा आमचा दृढनिश्चय आहे," या शब्दांत दोन्ही नेत्यांनी या मैत्रीची व्याप्ती स्पष्ट केली.












Click it and Unblock the Notifications