इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल!
North Korea missile launch : मध्य पूर्वेत इस्रायल-इराण संघर्षाने जागतिक तणाव वाढला असतानाच, पूर्व आशियातही स्थिती गंभीर बनली आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी इराणवरील अमेरिकेच्या कथित कारवाईचा तीव्र निषेध केला असून, त्याच वेळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन आपल्या लष्करी ताकदीचा इशारा दिला. यामुळे जपान, दक्षिण कोरियासह संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात घबराट पसरली आहे.

जपानी तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने शनिवारी एक संशयास्पद बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र डागले. NHK वृत्तवाहिनीने संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले की, हे क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) बाहेरील समुद्रात कोसळले. यामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, मात्र प्रादेशिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
[Emergency alert]
— PM's Office of Japan (@JPN_PMO) March 14, 2026
North Korea has launched a suspected ballistic missile. More updates to follow.
इराणमधील खार्ग बेटावर अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यावर किम जोंग-उन संतप्त झाले. उत्तर कोरियाने या कृतीला "निर्लज्ज" म्हटले, अमेरिकेच्या हालचाली जागतिक शांततेला धोका देतात आणि सार्वभौम राष्ट्रांवर हल्ले करणे ही त्यांची हुकूमशाही वृत्ती दर्शवते असा आरोप केला. इराण-उत्तर कोरियातील जुने संरक्षण संबंध पाहता, किम जोंग-उन यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरते.
ही क्षेपणास्त्र चाचणी ९ ते १९ मार्च दरम्यान दक्षिण कोरिया आणि अमेरिका करत असलेल्या वार्षिक संयुक्त लष्करी सरावादरम्यान झाली. उत्तर कोरिया या सरावांना "युद्धाची रंगीत तालीम" संबोधतो, परिणामी ही चाचणी अमेरिकन-दक्षिण कोरियन संयुक्त सरावाला थेट प्रत्युत्तर मानले जात आहे.
किम जोंग-उन यांनी अलिकडेच नवीन युद्धनौकेतून क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीचे निरीक्षण करत लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले. तसेच, सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या काँग्रेसमध्ये प्योंगयांगने अमेरिकेला 'अणुशक्ती' (Nuclear Power) म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याची मागणी पुन्हा केली आहे.
भू-राजकीय तज्ज्ञांनुसार, उत्तर कोरिया आता अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना दोन आघाड्यांवर गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मध्य पूर्वेत इराणला पाठिंबा देत आणि आशियात क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे किम जोंग-उन अमेरिकेवरील दबाव वाढवत आहेत.












Click it and Unblock the Notifications