तर तुमची 'अर्थव्यवस्था उद्ध्वस्त' करू; ट्रम्प यांच्या शिलेदाराची भारताला धमकी, वाचा संपूर्ण प्रकरण!
india russian oil donald trump policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू खासदार तथा त्यांचे जवळचे शिलेदार अशी ओळख असलेले लिंडसे ग्राहम यांनी भारताला धमकी दिली आहे.
भारताने जर त्यांच्या देशाच्या नियमाप्रमाणे काम केले नाही, तर आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त करून टाकू, असा इशारा त्यांनी दिलाय. नेमकी त्यांची मागणी काय आहे, आणि त्यांना भारताकडून काय अपेक्षित आहे. सिनेटर सदस्य थेट भारताला धमकी का देत आहे, त्यामागे अमेरिकन राष्ट्रध्यक्षांचा हात आहे का, याविषयी आपण जाणून घेणार आहोत..
२१ जुलै रोजी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी चीन, भारत आणि ब्राझीलला रशिया-युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यासाठी स्वस्त रशियन तेल खरेदी करत राहिल्यास गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. ग्राहम यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर हे देश रशियन तेलाची खरेदी थांबवणार नाहीत, तर अमेरिका त्यांच्या अर्थव्यवस्था 'उद्ध्वस्त' करायला मागे पुढे पाहणार नाहीत, असा थेट गर्भीत इशारा त्यांनी दिलाय.

भारताला धमकी का दिली?
अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर स्वस्त कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांना हा कडक इशारा दिला आहे.
त्यांच्या मते, चीन, भारत आणि ब्राझील हे तीन देश रशियाकडून सुमारे ८० टक्के कच्चे तेल खरेदी करतात. या मोठ्या खरेदीमुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी आवश्यक निधी मिळत आहे.
जर या देशांनी रशियन तेल खरेदी करणे थांबवले, तर रशियाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल आणि त्यांना युद्धासाठी पैसे उभारणे कठीण होईल, असे ग्राहम यांचा दावा आहे.
कोण आहेत ग्राहम लिंडसे, थेट धमकीचा इशारा का?
लिंडसे ग्राहम हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या खासदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात आणि ते त्यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणासाठीही प्रसिद्ध आहेत. फॉक्स न्यूजवरील मुलाखतीत ग्राहम यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिळणारी आर्थिक मदत थांबवू इच्छित आहे. यासाठी, ट्रम्प पुतिन यांना मदत करणाऱ्या देशांकडून होणाऱ्या आयातीवर १०० टक्के कर लादण्याचा विचार मांडलेला आहे.
दोन पर्याय: अमेरिका की पुतिन?
सिनेटर ग्राहम यांनी चीन, भारत आणि ब्राझील या देशांना दोन स्पष्ट पर्याय दिले आहेत. एकतर हे देश अमेरिकन अर्थव्यवस्था निवडतील, म्हणजेच अमेरिकेच्या नियमांनुसार व्यापार करतील. किंवा पुतिन यांना मदत करणे सुरू ठेवतील. ग्राहम यांनी विश्वास व्यक्त केला की, हे देश अमेरिकन अर्थव्यवस्था निवडतील.
पुतिन यांनाही इशारा
लिंडसे ग्राहम यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनाही आव्हान दिले. ते म्हणाले, "तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत खेळला आहात. तुम्ही मोठी चूक केली आहे. आता तुमची अर्थव्यवस्था कोसळत राहील. आम्ही युक्रेनला शस्त्रे पाठवत आहोत, जेणेकरून युक्रेनकडे पुतिनशी लढण्यासाठी पुरेशी शस्त्रे असतील." त्यांनी असाही आरोप केला की, पुतिन जुने सोव्हिएत युनियन पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.












Click it and Unblock the Notifications