भारताचं ठरलं! रशियातून अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा 3 मुद्द्यातून ट्रम्पना संदेश
Jaishankar meets Putin FM sends clear message to US on trade policy : भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे रशिया दौऱ्यावर आहेत.तिथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या टॅरीफ धोरणांवर जोरदार टीका केली आणि कच्च्या तेलाची खरेदी तसेच रशियाशी व्यापार वृद्धींगत करण्यावर भर देत तेल खरेदी, व्यापार धोरणाबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. यासह त्यांनी अमेरिकेला तेल खरेदीवरुन खडे बोल सुनावले आणि व्यापार खरेदीसंदर्भात आलेखच मांडला.
एकीकडे मनमानी आणि मुजोरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे मुद्दे खोडून काढत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाकडून तेल खरेदी सर्वात जास्त चीन करतो आणि रशियाशी व्यापारविषयक युएस आणि युरोपीय युनियनचे घनिष्ठ संबंध याकडे लक्ष वेधले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या रशिया भेटीतील ३ महत्त्वाचे मुद्दे
१. अमेरिकेच्या दबावावर टीका आणि भारताची भूमिका
अमेरिकेने भारतावर २५% आयात शुल्क (टॅरिफ) लावले होते आणि २७ ऑगस्टपासून ते आणखी २५% वाढवून एकूण ५०% पर्यंत नेण्याची भूमिका घेतली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे हे दबावतंत्र आहे, ज्याचा उद्देश भारतीय अर्थव्यवस्थेला कमकुवत करणे आहे. या पार्श्वभूमीवर, रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन ट्रम्प यांच्या धोरणांना प्रत्युत्तर देण्याच्या उपायांवर काम करत आहेत.
या संदर्भात, जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली आणि त्यानंतर तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली.
२.कच्च्या तेलाच्या खरेदीवर स्पष्टीकरण
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेच्या कान टोचले आणि स्पष्ट शब्दांत संदेश दिला की, केवळ भारतच रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार नाही. त्यांनी सांगितले की, रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार चीन आहे, आणि त्यानंतर युरोपियन युनियन असू शकते.
एस. जयशंकर म्हणाले की, २०२२ नंतर रशियासोबत सर्वाधिक व्यापार वाढवणारा देश भारत नसून दक्षिणेकडील काही देश आहेत. अमेरिकेतील लोक गेल्या काही वर्षांपासून जगातील तेल बाजारपेठ स्थिर करण्यासाठी सर्वकाही केले पाहिजे असे सांगत आहेत, परंतु भारताने अमेरिकेकडूनही तेल खरेदीचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्तिवादामुळे या संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
३. अमेरिकेचा दबाव झुगारुन भारत-रशिया संबंधांना बळकटी
भारत आणि रशियाने अमेरिकेचा दबाव झुगारून व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या बाबतीत झालेल्या बैठकीत भारत आणि रशियाने संतुलित आणि सतत व्यापार वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी, शुल्क आणि नियमांमधील अडथळे लवकर दूर करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications