इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंचे सुरक्षा कवच तुटले; सल्लागार शमखानी यांचा इस्त्रायल हल्ल्यात खात्मा!
Israel Iran war : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध काही केल्या संपेना, एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांच्या युद्धामुळे संपूर्ण जगातील देश आता दोन गटांमघ्ये विभागल्याचे पाहायला मिळू लागले आहेत.
अशातच, इस्रायलच्या वतीने सुरुवातीला करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे वरिष्ठ सल्लागार अली शमखानी यांचे नुकतंच निधन झाले आहे. इराणी राज्य माध्यमांनी शनिवारी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
इस्त्रायलच्या वतीने करण्यात आलेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक आणि सर्वात लक्ष्यित इस्रायली हल्ल्यांपैकी एक असल्याचे समजले जात आहे. ज्यामुळे इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला मोठा धक्काच बसला आहे. विशेष करून इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांचे सुरक्षा कवचच संपुष्टात आणले गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.

2023 पासून शमखानी होते सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार!
इराणी राजकारण आणि संरक्षण धोरणाच्या केंद्रस्थानी असलेले अली शमखानी हे जवळजवळ 10 वर्षे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख होते. 2023 मध्ये त्यांनी पद सोडले आणि सर्वोच्च नेते खमेनी यांचे विशेष सल्लागार म्हणून भूमिका स्वीकारली.
48 तासांत 20 हून अधिक इराणी अधिकारी मारले गेले!
इस्रायली संरक्षण दलांच्या (आयडीएफ) मते, या हल्ल्यांमध्ये २० हून अधिक वरिष्ठ इराणी लष्करी अधिकारी ठार झाले, ज्यात अनेक मोठी नावे समाविष्ट आहेत.
- रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन
- सलामी सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी
- आपत्कालीन कमांडचे प्रमुख मेजर जनरल गोलाम अली रशीद
IRGCने केली मृत्यूची पुष्टी
यासोबतच, इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन रणनीतीचे प्रमुख असलेले इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) एरोस्पेस फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अमीर अली हाजीजादेह यांचाही मृत्यू झाला.
काही अहवालांनुसार, जेव्हा हा हल्ला झाला होता. तेव्हा ते आणि त्यांचे अनेक वरिष्ठ सहकारी एका भूमिगत कमांड सेंटरमध्ये इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ल्याची तयारी करत असल्याचे समोर आले. इराणी सशस्त्र दलांच्या गुप्तचर युनिटचे प्रमुख गोलाम-रेझा मेरहाबी यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.












Click it and Unblock the Notifications