Israel-Iran War : "हो, माझ्या मित्राचा फोन आला होता; PM मोदींच्या आवाहनावर नेतान्याहूंचे स्पष्टीकरण
Israel-Iran War : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत कळीची ठरत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले आहेत. "पंतप्रधान मोदी माझे जवळचे मित्र आहेत आणि या कठीण काळात भारत इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे," अशा शब्दांत नेतान्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मैत्रीचा हात आणि शांततेचे आवाहन
सोमवार, २ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून या संभाषणाची माहिती दिली. मोदींनी नेतान्याहू यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली आणि पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीबद्दल भारताची चिंता व्यक्त केली. भारताने नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पुरस्कार केला असून, निष्पाप नागरिकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, यावर मोदींनी जोर दिला.
'बेट शेमेश'मधील भीषण वास्तव
पंतप्रधान नेतान्याहू यांनी सोमवारी 'बेट शेमेश' या शहराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याच ठिकाणी इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. पत्रकारांशी बोलताना नेतान्याहू यांनी मोदींच्या फोन कॉलचा विशेष उल्लेख केला.
ते म्हणाले, "मी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या संकटकाळात इस्रायल आणि ज्यू समुदायाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे आणि संपूर्ण भारताचे मनापासून आभार मानतो."
संभाषणातील गुप्तता पाळत त्यांनी पुढे मिश्किलपणे टिपणी केली की, "आम्ही नक्की काय चर्चा केली हे मी उघड करणार नाही, पण हो, माझ्या मित्राने फोन केला आणि आम्ही प्रदीर्घ संवाद साधला."
'ऑपरेशन रोअरिंग लायन' आणि जागतिक सुरक्षा
नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेले 'ऑपरेशन रोअरिंग लायन' हे केवळ इस्रायलच्या अस्तित्वासाठी नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यांनी इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले.
"इराणचा धोका केवळ इस्रायल किंवा अमेरिकेपुरता मर्यादित नाही. त्यांचे लक्ष्य युरोप आणि इतर प्रदेशही आहेत. सायप्रसमधील ब्रिटीश तळावर झालेला हल्ला याचेच उदाहरण आहे. जर या दहशतवादी राजवटीने अण्वस्त्रे मिळवली, तर ते संपूर्ण जगाला ओलीस धरतील. म्हणूनच आम्ही स्वतःचे रक्षण करताना जगाचेही रक्षण करत आहोत, असे स्पष्टीकरण पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
अमेरिका आणि इस्रायलची युती
या मोहिमेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन इस्रायलला पूर्ण सहकार्य करत असल्याचेही नेतान्याहू यांनी नमूद केले. इराणच्या 'इस्रायल मरण पावो, अमेरिका मरण पावो' या घोषणांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जो कोणी या दहशतवादी विचारसरणीच्या मार्गात येईल, त्याला इराण लक्ष्य करेल.












Click it and Unblock the Notifications