इराणमधील संघर्षाचा जागतिक हवाई मार्गांना फटका; भारतीय विमान कंपन्यांनी इराणची हवाई हद्द टाळली
India Iran travel advisory : इराणमधील वाढता अंतर्गत निषेध आणि पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम आता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर होऊ लागला आहे. इराणने आपली हवाई हद्द बंद करून NOTAM (Notice to Air Missions) जारी केल्यामुळे, भारतीय विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोठे निर्णय घेतले आहेत. याचा थेट परिणाम विमान भाड्यावर आणि प्रवासाच्या वेळेवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एअर इंडिया आणि इंडिगोचा मोठा निर्णय
इराणवरून जाणारी उड्डाणे आता पर्यायी आणि लांबच्या मार्गाने वळवण्यात येत आहेत. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत प्रमुख भारतीय कंपन्यांनी खालील बदल केले आहेत:
एअर इंडिया (Air India)
एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, जिथे पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, अशी उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस तपासावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.
इंडिगो (IndiGo)
इंडिगोने देखील आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याची पुष्टी केली आहे. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे सांगत त्यांनी प्रवाशांना 'री-बुकिंग'चे लवचिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
प्रवासाचा वेळ अन्य खर्च वाढणार
इराणची हवाई हद्द टाळण्यासाठी विमानांना आता लांबचा वळसा घालून जावे लागणार आहे. लांबच्या मार्गामुळे इंधनाचा वापर वाढेल, परिणामी विमान भाड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. युरोप आणि पाश्चात्य देशांकडे जाणाऱ्या विमानांना आता पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागणार आहे.
पाकिस्तानचा मार्ग आधीच बंद
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांसाठी हवाई हद्द बंद केल्यामुळे आधीच भाडे वाढलेले आहे; आता इराणच्या संकटामुळे यात भर पडली आहे.
अमेरिका आणि भारताची सावध पावले
मध्य पूर्वेतील बिघडलेली परिस्थिती पाहता जागतिक स्तरावर हालचाली वेगवान झाल्या आहेत.
भारताची अॅडव्हायझरी: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तेथील भारतीयांची मायदेशी परतण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
अमेरिकेची माघार : इराणकडून अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्यानंतर, अमेरिकेने आपल्या काही लष्करी तळांवरून कर्मचारी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
जर तुम्ही आगामी काळात आंतरराष्ट्रीय प्रवास करणार असाल, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.
- तुमच्या एअरलाईनच्या अधिकृत वेबसाइटवर विमानाचे स्टेटस तपासा.
- विमान भाड्यात अचानक वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करा.
- विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईनकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेजकडे लक्ष द्या












Click it and Unblock the Notifications