व्हेनेझुएलात USची कारवाई;राष्ट्राध्यक्ष मादुरो अटकेत,भारताची पहिली प्रतिक्रिया..'अॅडव्हायझरी'जारी!
India Breaks Silence on Venezuela Crisis : व्हेनेझुएलामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व राजकीय आणि लष्करी पेचप्रसंगावर भारताने अखेर आपले मौन सोडले आहे. अमेरिकेने केलेल्या धडक कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर, भारत सरकारने या संपूर्ण प्रकरणावर "खोल चिंता" व्यक्त केली असून तेथील भारतीय नागरिकांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत.

अमेरिकेची 'नार्को-दहशतवादा'विरोधात मोठी कारवाई
शनिवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे एक धाडसी लष्करी मोहीम राबवली. या कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले आहे की, ही मोहीम 'नार्को-दहशतवादा' विरुद्धचा एक भाग आहे. मादुरो यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात आले असून, जोपर्यंत कायदेशीररित्या सत्ता हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत अमेरिकन प्रशासन व्हेनेझुएलाचा कार्यभार सांभाळणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
भारताची भूमिका: 'शांतता आणि संवादाला प्राधान्य'
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी अधिकृत निवेदन जारी करून या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की, व्हेनेझुएलातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे.
भारताची प्राथमिकता तेथील सामान्य जनतेची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण हीच आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडून सर्व संबंधित पक्षांनी संवादाच्या माध्यमातून आणि शांततापूर्ण मार्गाने हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन भारताने केले आहे.
भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (Travel Advisory)
व्हेनेझुएलातील अस्थिरता पाहता, भारत सरकारने तेथे वास्तव्यास असलेल्या आणि प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
१. प्रवास टाळा : भारतीय नागरिकांना सध्या व्हेनेझुएलाचा कोणताही अनावश्यक प्रवास टाळण्याचा कडक सल्ला देण्यात आला आहे.
२. अत्यंत सावधगिरी बाळगा : जे भारतीय नागरिक सध्या व्हेनेझुएलामध्ये आहेत, त्यांनी घराबाहेर पडणे टाळावे, आपल्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात आणि स्थानिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे.
३. दूतावासाशी संपर्क : कराकसमधील भारतीय दूतावास स्थानिक भारतीयांच्या संपर्कात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क
व्हेनेझुएलामध्ये अडकलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केला आहे:
- ईमेल: [email protected]
- फोन (आपत्कालीन): +58-412-9584288












Click it and Unblock the Notifications