Donkey Route मधील भारतीयाची रोमांचक कहाणी! 182 दिवसांच्या यातना, मुत्राने आंघोळ; वाचा खूशप्रीतची कथा
हरियाणातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी खुशप्रीत हे नुकतेच अमेरिकेतून हद्दपार झाल्यानंतर घरी परतले. खुशप्रीत यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एजंट, माफियांनी केलेला छळ, सहा महिन्यांच्या मरणयातना, डाँकी रुटचा थरार खुशप्रीत यांनी बुधवारी भारतात परतल्यावर सांगितला. त्यांची कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. मी आज जिवंत आहे, हेच माझ्यासाठी सरप्राईज आहे, असं खुशप्रीत सांगतो.

काय होती कहाणी?
खूशप्रीत हा कुरुक्षेत्रचा रहिवाशी आहे. अमेरिकेत जावून भरपूर पैसे कमावू व कुटुंबाला खूश ठेऊ, हे त्याचे स्वप्न होते. त्याचे हेच स्वप्न त्याला अमेरिकेत घेऊन गेले. अमेरिकेत जाण्यासाठी त्याला एक एजंट भेटला. त्या एजंटाने त्यांच्याकडे ४५ लाख रुपयांची मागणी केली. खुशप्रीत म्हणतो, माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. मात्र अमेरिकेत जाण्याची योजना मी कुटुंबाला सांगितली. त्यानंतर कुटुंबाने आमची शेती, घर, अगदी जनावरांसाठी कर्ज घेऊन मला पैसे दिले. मी एजंटला पैसे देऊन अमेरिकेत जाण्याची स्वप्ने रंगवली. मात्र पुढे जे घडले, ते अगदीच अनपेक्षित होते.
182 दिवस झाला छळ
खुशप्रीत म्हणाला की, एजंट मला डाँकी रुट मार्गाने घेऊन गेला. मला डाँकी रुट काय असतो, हे माहित नव्हते. मी एजंटने सांगितल्याप्रमाणे करत राहिलो. मला अमेरिकेत पोहोचण्यासाठी सहा महिने लागले. तिथे पोहोचताच अमेरिकन पोलिसांनी त्याला अटक केली. मी तिथे फक्त १२ दिवस राहिलो. नंतर मला हद्दपार करण्यात आले. पण १८२ दिवस मी सहन केलेला छळ मी कधीही विसरणार नाही. मी प्रत्येक तरुणाला विनंती करतो की, त्यांनी एजंटांच्या जाळ्यात अडकून कधीही परदेशात जाऊ नये. तुमच्या जीवालाही धोका असू शकतो. मी जिवंत परतलो आहे, हे माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही.
कसा होता प्रवास?
आपल्या प्रवासाची कहाणी कशी होती हे सांगताना खुसप्रीत म्हणाला की, मी दाट घनदाट जंगले, पर्वत आणि विस्तीर्ण महासागरांमधून लहान बोटींमध्ये प्रवास करून सहा महिन्यांनी अमेरिकेला पोहोचलो. या दरम्यान, एजंटच्या माणसांनी मला वाटेत विजेचे झटके दिले. लघवीने आंघोळ घातली. त्यांनी मला बरेच दिवस उपाशी ठेवले. मी बरेच दिवस जंगलात फिरलो. जेव्हा मी अमेरिकेत पोहोचलो तेव्हा मी फक्त १२ दिवस राहू शकलो. तिथून, मला एखाद्या खतरनाक गुन्हेगाराप्रमाणे हातपाय साखळदंडांनी बांधून घरी पाठवण्यात आले. सुदैव एवढेच की मी आज जिवंत आहे.
हरियाणात एजंटांचे जाळे
तरुणांना डाँकी रुटने अमेरिकेत पाठवणाऱ्या एजंटांची हरियाणातील साखळी आहे. आता हिच साखळी पोलिस शोधत असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकरणांसाठी, राज्यात आधीच स्थापन केलेल्या एसआयटीने सर्व जिल्ह्यांच्या एसपींना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की अशा एजंटांची यादी बनवून कारवाई करावी, त्यांना अटक करावी. दरम्यान, कुरुक्षेत्रात, गुरुवारीच अमेरिकेतून परतलेल्या सर्व १४ लोकांच्या तक्रारी घेण्यात आल्या. एसआयटी प्रमुख सिबास कविराज यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, ज्या जिल्ह्यातील तरुण भारतात परतले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पोलिस स्वतः तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या तक्रारी घेत आहेत. यानंतर, त्यांना पाठवणाऱ्या सर्व ट्रॅव्हल एजंट्सवर कट रचून फसवणूक यासह विविध कलमांखाली कायदेशीर कारवाई केली जाईल. डाँकी रूटवरून येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असताना, त्यांची नावे पोलिस रेकॉर्डमध्ये देखील जोडली जातील.
ट्रॅव्हल एजन्सींची चौकशी
हरियाणातील अनेक जिल्ह्यांतील ट्रॅव्हल एजन्सीजची नोंदणी देखील पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलिस ट्रॅव्हल एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड, एजन्सीजचे कामकाज आणि त्यांच्यामार्फत परदेशात प्रवास करणाऱ्या काही लोकांचे रेकॉर्ड तपासतील आणि त्यांच्याशीही बोलतील, असे काहींचे म्हणणे आहे. जर काही अनियमितता आढळून आली तर ट्रॅव्हल एजन्सी आणि एजंटवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications